आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहारमध्‍ये कैद्यांना छळतोय अफझल गुरूचे भूत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कधी तो मांडी घालून बसलेला असतो. कधी निर्विकारपणे नुसताच फिरत राहतो, तर कधी डोक्याला मफलर गुंडाळलेला तो तिरकी मान करून एकटक बघत राहतो. तो यापैकी काहीच करत नसला तरी त्याची नुसती आठवणही काळजावर ओरखडा उठवते.अफझल गुरूच्या भुताने तिहारच्या जेलमध्ये असा उच्छाद मांडला आहे. तिहारमधील कैद्यांचे तरी असेच म्हणणे आहे. सरकारसाठी थंड डोक्याचा क्रूरकर्मा अफझल गुरू मेला असला तरी तिहारमधील कैद्यांच्या मानेवर तो भूत बनून बसला आहे.

तिहार तुरुंगाच्या अंधारकोठड्यांमध्ये भटकणा-या अफझलच्या दाढीधारी आत्म्याने तिथल्या कैद्यांची झोप उडवली आहे. तिहारमधील कैद्यांच्या मते, अफझलचा आत्मा बराक नंबर तीनच्या आसपास फिरतो आहे. काही कैद्यांच्या रात्रीच्या स्वप्नांचा ताबाच अफझल गुरूने घेतला आहे. या कैद्यांनी तुरुंगाच्या व्यवस्थापनाकडे या भुताटकीची तक्रार केली असून अफझलच्या आत्म्याच्या शांतीसाठी होमहवन करण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येते. अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या अफझल गुरूला ९ फेब्रुवारीला अत्यंत गुप्तपणे फाशी देण्यात आली. जवळपास 12 वर्षे त्याच्या आजूबाजूला राहणा-या कैद्यांनाही त्याच्या फाशीची कानोकान खबर नव्हती. अफझलला फासावर लटकवल्यानंतरच त्यांना त्याबाबत माहिती मिळाली. तेव्हापासून बराक नंबर तीनमधील कैद्यांचा धीरच खचला. सतत अफझलचा विचार आणि त्याच्याबाबतच्या चर्चेने सगळ्यांच्याच मनात भीतीने घर केले आहे.