आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची लाट दक्षिणेत, कडाक्याच्या थंडीमुळे आंध्रात 15 जण मृत्युमुखी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे /नवी दिल्ली - उत्तरेकडे मुक्कामाला असलेली थंडीची लाट आता दक्षिणेकडे सरकल्याने गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथेही तापमानात लक्षणीय घट झाली असून आंध्र प्रदेशमध्ये तर पंधरा जण थंडीने मृत्युमुखी पडले आहेत.
कर्नाटकमध्ये किमान तापमानाचे सुमारे सव्वाशे वर्षांचे विक्रम या थंडीने मोडीत काढले आहेत.
आंध्र प्रदेशातील सीमेवरच्या तेलंगणा परिसरात पारा 1 अंश सेल्सियसपर्यंत घसरला आहे. गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथील सरासरी किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे, असे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशसह ओडिशा, मध्य प्रदेश आणि राजस्थानातही थंडीची लाट पसरली आहे. हिमालयानजीकच्या राज्यांतील बर्फवृष्टीचे प्रमाणही वाढते आहे. अतिशीत वा-यांचे प्रमाण अणि घनता, निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे दक्षिणेकडे वळले आहे. ही परिस्थिती दीर्घकाळानंतर उद्भवल्याने दक्षिणेकडील एरवी उबदार असणारी राज्ये सध्या गारठली आहेत, असे वेधशाळेने म्हटले आहे.
कर्नाटकमध्ये मडिकेरी येथे 4.8 अंश (गेल्या 132 वर्षांतील नीचांकी तापमान), म्हैसूरमध्ये 7.7 अंश (गेल्या 120 वर्षांतील नीचांकी तापमान) तर बेळगावमध्ये 7.2 अंश तापमान नोंदले गेले आहे. आंध्रामधील आदिलाबाद येथे तापमानाने 4 अंश घसरण करत सहा बळी घेतले आहेत. आगामी दोन ते तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली. तापमानात सुमारे दोन अंशाने घट होऊ शकते, असे म्हटले आहे. येत्या 48 तासात संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग येथे हवामान कोरडे राहील. दिवसाही थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.
प्रमुख शहरांतील किमान तापमान पुढीलप्रमाणे
औरंगाबाद 10.6 नाशिक 7.5,
अहमदनगर 6.1 नागपूर 12.4
सांगली 11.8 मुंबई 10.6
पुणे 9.4 रत्नागिरी 15.4
सोलापूर 12.7 मालेगाव 9.6
सातारा 9.8 परभणी 11.5