आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेहराडूनमध्ये टीम अण्णावर बूटहल्ला, अण्णा टोपी घातलेल्या दारुड्याचे कृत्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून/हरिद्वार - भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सक्षम लोकपालाची नियुक्ती करण्याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या मोहिमेत पहिल्याच दिवशी टीम अण्णाला बूट हल्ला सहन करावा लागला. डेहराडूनमध्ये दाखल झालेल्या टीमवर एका माथेफिरूने बूट
फेकला. सुदैवाने तो कोणाला लागला नाही. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. यापूर्वी लखनऊ येथे टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर असाच बूट फेकण्यात आला होता.
हा प्रकार घडला तेव्हा टीम अण्णाचे सदस्य किरण बेदी, अरविंद केजरीवाल, मनीष शिसोदिया आणि कुमार विश्वास ही मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. बूट फेकून मारणा-याचे नाव किसन लाल असून तो व्यासपीठपासून 20 मीटर अंतरावर होता. लाल रंगाची अण्णा टोपी घातलेला किसन दारूच्या नशेत होता. कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी केलेल्या वक्तव्यावरून किसन प्रचंड संतापलेला होता. टीम अण्णाच्या सदस्यांवर हल्ला होण्याचे प्रकार यापूर्वी वारंवार घडले आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यावर कार्यालयातच हल्ला झाला होता. त्यांना बेदम मारहाण करण्यात
आली होती. त्यापूर्वी लखनऊमध्ये अरविंद केजरीवाल यांनाही धक्काबुक्की झाली होती.

राजकीय पक्षांना प्रश्न
लोकपाल विधेयक कुचकामी आहे काय ?
सीबीआय सरकारी नियंत्रणमुक्त असावी हे मान्य आहे काय?
तुम्ही संसदेत विधेयकाला विरोध करणार का? सविस्तर. पान 12

भ्रष्टांना मते देऊ नका
जनजागृती मोहिमेच्या पहिल्या दिवशी टीम अण्णाने भ्रष्ट उमेदवारांना मते देऊ नका, असे सांगत एखादा नेता मते मागण्यासाठी आला तर त्याला विचारा, सक्षम लोकपाल विधेयक आणण्याची तुमची इच्छा आहे का? जर तो हो म्हणाला, तर विचारा की सरकारवर ते दबाव का आणत नाहीत?, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने तयार केलेला लोकपाल विधेयकाचा मसुदा भ्रष्टांना संरक्षण देणारा आहे, असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींना प्रश्न
सत्ताधारी यूपीए सरकारने लोकपालचा मसुदा तयार केला, मात्र सीबीआयला कक्षेबाहेर ठेवले. यावर टीम अण्णाने राहुल गांधींनाच प्रश्न केला. सीबीआयला कक्षेत आणल्याविना सरकार हे विधेयक का आणू इच्छिते?
भाजपवर आरोप
उत्तराखंडमधील भाजप सरकारवर टीमने टीका केली. माजी मुख्यमंत्री निशंक पोखरियाला यांच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे सांगून हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळ्यातही कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.
सगळेच जबाबदार
संसदेत दीर्घ चर्चा आणि अनेक दुरुस्त्या आल्या. तरीही सक्षम लोकपाल विधेयक पारित होऊ शकले नाही याला केवळ काँग्रेसच नव्हे तर भाजप, बसपा, सपा आणि डावे पक्षही जबाबदार आहेत.
अरविंद केजरीवाल