आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोकरावांची दिल्लीतील पत घसरली, चव्हाण समर्थकांना सोनिया गांधींनी भेट नाकारली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची दिल्लीतील पत घसरली असल्याची चर्चा राजधानीतील राजकीय वर्तुळात आहे. चव्हाण समर्थक बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले. मात्र सोनियांनी त्यांना भेट नाकरत महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांना भेटण्याचा सल्ला दिला.
यानंतर अशोक चव्हाण यांची दिल्लीतील पत घसरली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात रंगली. आदर्श प्रकरणामुळे चव्हाण यांच्या वाट्याला राजकीय विजनवास आला. या प्रकरणाशी नाव जोडले गेलेले अन्य दोन माजी मुख्यमंत्री हे सध्या केंद्रीय मंत्री असून आदर्श प्रकरणी ते एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे झाले आहेत.
आदर्शप्रकरणी सीबीआयने चव्हाण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यामुळे चव्हाण यांच्यावर अन्याय झाल्याची तसेच पक्षश्रेष्ठी पाठीशी उभे राहात नाहीत, अशी भावना चव्हाण समर्थक कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या मनात तयार झाली. आदर्शची जागा ही राज्य सरकारचीच असताना काँग्रेस बोटचेपी भूमिका घेत असल्याबद्दल चव्हाण समर्थक नाराज आहेत. त्यासाठी ते काँग्रेस अध्यक्षांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार होते.
दरम्यान, सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीत राज्यातील ४० आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट केले होते. राज्यात माजी मुख्यमंत्रीच असुरक्षित असेल, तर सामान्य आमदारांची काय कथा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
विधान भवनात झालेल्या या बैठकीत काँग्रेसच्या तीन मुख्यमंत्र्यांना आदर्श घोटाळ्यात अडकवून काँग्रेस संपवण्याचे षड्यंत्र भारतीय जनता पक्षाने आखले असल्याचे पत्र ४२ आमदारांनी सोनियांना लिहिले. तसेच ४२ आमदारांनी आम्ही अशोक चव्हाणांच्या पाठीशी असल्याचे पत्र लिहिले व त्यावर सह्या केल्या होत्या.
मात्र, चव्हाण समर्थक आज जेव्हा सोनियांना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांना भेट नाकारण्यात आली आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांना भेटण्याचा सल्ला दिला. यावरुन चव्हाणांचे दिल्लीत आता काहीही चालत नाही अशी चर्चा आहे.
अशोक चव्हाण समर्थकांचे दिल्लीकडे उड्डाण; 200 कार्यकर्ते रवाना
अशोक चव्हाण पुन्हा गोत्यात; हॉटेलला वाढीव एफएसआय
माजी मुख्यमंत्री असुरक्षित तर आमची काय कथा?
चव्हाण यांचे बोट महसूल सचिवांकडे