आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम दंगलीच्या दहशतीचे एसएमएस पाकमधून- गृह सचिव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ईशान्येकडील लोकांविरुद्ध देशभरात पसरवले जाणारे एसएमएस आणि एमएमएस पाकिस्तानातून पाठवण्यात येत आहेत, असा दावा केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंह यांनी केला आहे. दरम्यान, दक्षिण भारतात सुरू झालेले हे दहशतीच्या एसएमएसचे लोण शनिवारी दिल्लीतही धडकले. तथापि, पोलिसांनी ईशान्यवासीयांना सुरक्षेची ग्वाही दिली आहे.
त्यातच शनिवारी अलाहाबादेत लागू करण्यात आलेली संचारबंदीही हटवण्यात आली आहे. सीबीआयने आसाममधील हिंसाचाराची माहिती देणा-यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अफवांच्या चौथ्या दिवशीही बंगळुरूमधून ईशान्यवासीयांचे पलायन सुरूच होते. गृह सचिव सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानच्या 76 वेबसाइट्सची ओळख पटवण्यात आली आहे. यावर फोटो एडिट करून अपलोड करण्यात आले आहेत. जगभरातील भूकंप, चक्रीवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बळी जाणा-यांचे मृतदेह या साइटवर टाकण्यात आले आहेत. त्यानंतर हे लोक आसाम हिंसाचारात मारले गेल्याचे म्हटले आहे. हा प्रकार निषेधार्ह आहे. हा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला जाईल, असेही सिंह यांनी म्हटले आहे. चार दिवसांपासून दक्षिणेतील राज्यांत ईशान्यवासीयांच्या विरोधात एसएमएस पाठवले जात आहेत.
30 हजार लोकांचे पलायन- गेल्या चार दिवसांत एकट्या बंगळुरूमधून 30 हजार लोकांनी पलायन केले आहे. त्याच वेळी चेन्नई, पुणे, मुंबई आणि हैदराबादेतूनही पलायन सुरूच आहे. तथापि, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शनिवारी ईशान्येकडे जाणा-या लोकांची संख्या रोडावली होती, असे अधिका-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शनिवारी कोणतीही स्पेशल ट्रेन सोडण्यात आली नव्हती.