आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवांची दंगल: आसामची धग दक्षिणेत; बंगळुरू, हैदराबादेतून पलायन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- आसाम दंगलीच्या पार्श्वभूमीवर ईशान्येतील नागरिकांवर हल्ले होणार असल्याची अफवा पसरल्यानंतर भेदरलेल्या ईशान्येतील नागरिकांनी आपल्या राज्यात पलायन करण्यास सुरुवात केली. आपले घर गाठण्यासाठी खचाखच भरलेल्या रेल्वेमधून बुधवारी 6800 नागरिकांनी बंगळुरू सोडले. दरम्यान, सरकारने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेचा विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. ईशान्येतील नागरिक राहत असलेल्या भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अफवा पसरवणा-याविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी उच्चस्तरीय बैठकीत बंगळुरूमधील स्थितीचा आढावा घेतला. ईशान्येतील नागरिकांनी काळजी करण्याचे काम नाही. त्यांना संपूर्ण सुरक्षा पुरवली जाईल, असे शेट्टर यांनी बैठकीनंतर सांगितले. गृहमंत्री आर. अशोक यांनी हा विषय संवेदनशील असून देशातील अन्य राज्यांशी संबंधित असल्याने त्याबाबतची माहिती दिली जाऊ शकत नसल्याचे सांगितले. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अफवा पसरवणा-यांविरुद्ध कडक करण्याचे आदेश बजावल्याचे दिल्लीत सांगितले. ज्यांना ईशान्येकडे जावयाचे आहे, त्यांच्यासाठी विशेष रेल्वेसेवा पुरवली जात आहे. ईशान्येतील नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या वृत्ताबाबत केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग म्हणाले की, संबंधितांना देशात कुठेही धोका नाही. ईशान्येतील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केल्याची माहिती शेट्टर यांनी दिली आहे. ईशान्येतील प्रसारमाध्यमांनी सबळ पुराव्याअभावी वृत्त देऊ नये, तसे केल्यास विनाकारण भीती निर्माण होईल, असे शेट्टर म्हणाले.
संघ स्वयंसेवकांचा पुढाकार- सरकारमधील मंत्री ईशान्यतील नागरिकांचे मन वळवण्यासाठी रेल्वे स्थानकावर ठाण मांडून आहेत. गृहमंत्री अशोक यांच्यानंतर विधी मंत्री सुरेश कुमार ईशान्येचा लोंढा रोखण्याच्या प्रयत्नात आहेत. याव्यतिरिक्त राष्टीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक या कामात गुंतले आहेत. दरम्यान, मूळ मिझोरामचे असलेले पोलिस महासंचालक लालरुखुमा पचउवा यांनी ईशान्येतील नागरिकांना मारहाण केल्याची एकही तक्रार नसल्याचे म्हटले आहे.
अफवा कशी पसरली- लोकांना एसएमएस करून धमकी दिली जात आहे. शहर आणि राज्य सोडून गेला नाहीत तर गंभीर परिणाम होतील, असे संदेशात म्हटले आहे. अफवा पसरविण्यासाठी एमएमएसव्यतिरिक्त फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर केला जात आहे. दरम्यान, ईशान्येच्या 1000 नागरिकांनी हैदराबादमधून पलायन केल्याचे वृत्त आहे.
ईशान्येतील खासदार सोनियांना भेटले - ईशान्येच्या राज्यांतील विद्यार्थ्यांबाबतच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या या राज्यांतील खासदारांनी गुरुवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. केंद्रीय ईशान्य राज्य विकास राज्यमंत्री प्रबन सिंग घोटोवार यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी भेट घेतली. ईशान्येतील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवली जाईल आणि आपण सर्व भारतीय म्हणून राहू, असे सोनिया म्हणाल्याचे घोटोवार म्हणाले.
- आमच्यावर हल्ला होणार असल्याच्या अफवेमुळे आम्ही खूप घाबरलो आहोत. त्यामुळे शहरात राहण्यापेक्षा रेल्वेस्थानकावर आलेले बरे, या विचाराने इथे आलो. मला इथे सुरक्षित वाटत आहे.- दिसेन, तंत्रज्ञान विषयाचा विद्यार्थी