आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपाशीपोटी जीव मुठीत धरुन तीन दिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोक्राझार- अल्पसंख्याक मुस्लिम आणि बोडो नागरिकांनी एकमेकांच्या जीवावर उठत आसाममध्ये गेल्या आठवड्यात मोठा रक्तपात घडवला. जातिय विद्वेषातून पेटलेली आग दिवसेंदिवस वाढत होती. ठिकठिकाणी बहुसंख समुदाय अल्पसंख्याक नागरिकांवर निशाणा साधत होता. दोन्ही समाजाचा हिंसाचार अनुभवलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्याची कशी धडपड केली याची एक-एक कथा आता समोर येत आहे.
कोक्राझारपासून 23 कि.मी.अंतरावरील मालगावचे रहिवासी असलेले पुलेन गयारी म्हणाले की, आम्ही घरात होतो, तेव्हा एकच गलका ऐकू आला. शस्त्रसज्ज मुस्लिमांच्या जमावाने हल्ला चढवला. जीव वाचवण्याठी वनात पळलो. महिला, वृद्ध, पुरुष आणि मुले घरात राहिल्याने त्यांना जीव गमवावा लागला. आपण वनात विनाअन्न-पाण्याचे तीन दिवस काढल्यामुळे प्राण वाचले. त्यानंतर एका नातेवाईकडे विसावा घेतला आणि त्यानंतर मदत छावणी गाठली.
कोक्राझारपासून सात कि.मी. अंतरावरील धुरामारी गावातील मोमिन अली यांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. हिंसाचारातून सहीसलामत सुटका करून घेतलेले अली म्हणाले की, मोटारसायकलवरून आलेल्या बोडो युवकांनी गावात अंधाधुंद गोळीबार केला. हातबॉम्बच्या साहाय्याने स्फोटही घडवले. आपला शेजारी रहीमच्या पायात गोळी घुसली. मात्र, अली कुटुंबासोबत पळून जाण्यात यशस्वी झाले. अली गेल्या सात दिवसांपासून धुबरी जिल्ह्यातील काशीपाडा मदत छावणीत राहत आहेत. व्यवसायाने मजूर असलेले अली तीन दिवसांपासून कामावर गेले नाहीत. आपण पुन्हा गावी जाऊत का, याबद्दल अली यांच्या मनात शंका आहे. मुस्लिमबहुल धुरामारी गावातील सर्व घरे बुलडोझर लावून भुईसपाट करण्यात आली.
बांगलादेशातून घुसखोरी केलेल्या मुस्लिमांनी येथील जमिनींवर कब्जा केल्याचा आरोप हिंदू बोडो आदिवासींनी केला आहे. एखादा आपल्या घरावर कब्जा करत असेल, तर आपल्याला कसे वाटेल. आमच्यासोबत असे घडले आहे, असे बोडो नेते हागरामा मोलिहारी यांचे म्हणणे आहे. 1987 पासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनानंतर 2003 मध्ये चार जिल्हे मिळून बोडो टेरोटियल कौन्सिलची स्थापना करण्यात आली. या जिल्ह्यात 25 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या बोडोची आहे. 40 सदस्यांच्या कौन्सिलमध्ये 30 सदस्य बोडो आहेत. त्यावेळपासून हिंसाचाराच्या घटनांत कमतरता आली नाही.
आम्ही अनेक पिढ्यांपासून येथे राहत असून बोडो हिंसाचाराच्या आड जमिनी बळकावत असल्याचा आरोप मुस्लिमांचा आहे. कौन्सिलमध्ये आणखी प्रतिनिधित्व असावे, अशी त्यांची मागणी आहे. काही मुस्लिम संघटनांनी कौन्सिल बरखास्तीची मागणी केली आहे. ही मागणीही तणावामागेच प्रमुख कारण आहे. आसाममध्ये सहा टक्के लोकसंख्या असलेले बोडो कछारी स्वत:ला भूमीपुत्र समजतात. 200 वर्षे आसामवर राज्य करणा-या अहोम राजांनाही ते परके समजतात. तामिळनाडूत द्रविड आर्यांबाबत जशी भूमिका घेतात, तशीच ती बोडोंचीही आहे.