आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसामची धग : सोशल साइट्सवर निगराणी; संसद दणाणली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू, नवी दिल्ली- आसाम दंगलीमुळे ईशान्येकडील नागरिकांच्या मनातील दहशत कायम आहे. देशभरातील अनेक शहरांमधून शुक्रवारी सलग तिस-या दिवशीही ईशान्येच्या नागरिकांचे पलायन सुरूच होते. दरम्यान, हल्ल्यांच्या अफवांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने एकगठ्ठा एसएमएस आणि एमएमएसवर बंदी घातली आहे.शिवाय मोबाइलवरून 20 केबीपेक्षा जास्त डाटा पाठवण्यासही मनाई करण्यात आली आहे. फेसबुक, ट्विटर, ऑर्कुटसारख्या सोशल साइट्सवर निगराणी ठेवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.
एकगठ्ठा एसएमएस आणि एमएमएसवर 15 दिवसांकरिता बंदी घालण्यात आली आहे. या दिवसांमध्ये एका मोबाइल नंबरवरून एकाच वेळी केवळ 5 पेक्षा अधिक एमएमएस अथवा एसएमएस पाठवता येणार नाहीत. इकडे संसदेत ईशान्येकडील नागरिकांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून जोरदार हंगामा झाला. या नागरिकांना सर्व प्रकारची सुरक्षा पुरवण्यात येईल, अशी हमी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी संसदेत दिली. दरम्यान, रेल्वेनेही भेदरलेल्या नागरिकांना घरी लवकर पोहोचण्यासाठी अनेक विशेष गाड्या सोडल्या आहेत. बंगळुरूव्यतिरिक्त मुंबई, पुणे, हैदराबाद, म्हैसूर, मंगलोर आणि कोडगू या शहरांमधूनही अनेक नागरिकांनी गाशा गुंडाळला आहे. केवळ बंगळुरूमधून 15 हजार लोक आपल्या घरी परतले आहेत. उर्वरित शहरे मिळून आतापर्यंत 40 हजार नागरिकांनी आपापल्या गावी जाणे पसंत केले आहे. धमक्यांचे एसएमएस मिळाल्यानंतर ईशान्येकडील नागरिकांचे पलायन सुरू झाले होते.
पंतप्रधानांची हमी : संसदेच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी ईशान्येकडील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून यावर चर्चा करण्यात आली. या वेळी चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, ईशान्येकडील लोकांना देशाच्या कुठल्याही भागात राहण्याचा हक्क आहे. त्यांच्याविरुद्ध अफवा पसरवणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. लोकसभा आणि राज्यसभेत सर्व पक्षांनी एकमताने पूर्वोत्तर राज्यांतील नागरिकांच्या समर्थनार्थ ठराव पारित केले.
विमानप्रवास महागला- विमान कंपन्यांनी पूर्वोत्तर राज्यांतील विमानाच्या तिकीट दरांमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. बंगळुरू-गुवाहाटी विमानाचे तिकीट 18 हजार रुपये झाले आहे. नेहमीच्या दरांपेक्षा हे दर पाचपट अधिक आहेत. एका ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीनुसार बंगळुरू, हैदराबाद आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमधून पूर्वोत्तर राज्यांत जाणा-या लोकांच्या संख्येत 300 टक्के वाढ झाली आहे.
राज्यांची आयटी पथके सज्ज- दूरसंचार मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले की,कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडे वेबसाइट, सोशल मीडियावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे. आक्षेपार्ह मजकुरावर निगराणी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. आक्षेपार्ह मजकूर दिसल्यास साइट ब्लॉक करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. राज्यांमधील आयटी पथकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
बंगळुरूत पाच जणांना अटक- बंगळुरू शहरात आज अफवा पसरवणा-या पाच जणांना अटक करण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सर्व लोकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.राज्यभरात पोलिस गस्त घालीत असून नागरिकांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. दरम्यान, आसाममध्ये इतर शहरातून येणा-या नागरिकांसाठी 216 शिबिरांची व्यवस्था करण्यात आली आहे. आसामचे कृषिमंत्री नीलमोणी सेन डेका आणि परिवहनमंत्री चंदन ब्रह्मा बंगळुरूत पोहोचले आहेत.
सोशल मीडियावर बंदीची मागणी- राज्यसभेतील चर्चेच्या वेळी फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. सोशल साइट्समुळे अफवांना ऊत आल्याचे सांगून या साइट्सवर बंदी घालण्याची मागणी सपाचे सदस्य रामगोपाल यादव यांनी केली.