आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलावले म्हणून परतलो- ईशान्येकडील लोकांच्या भावना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी, रांगिया- थेट धमकी मिळालेली नसताना केवळ हल्ल्याच्या अफवांमुळे ईशान्येकडील राज्याचे हजारो नागरिक आपल्या घरी परत गेले असल्याचे स्पष्ट होत आहे. बंगळुरूहून आलेल्या विशेष रेल्वेगाडीतून शनिवारी सकाळी सुमारे 1700 नागरिक आसामला पोहोचले. त्यापैकी अनेकांनी थेट हल्ल्याची धमकी मिळालेली नसून केवळ काळजीपोटी कुटुंबीयांकडून फोन आल्यामुळे घरी परतल्याचे सांगितले. परिस्थिती निवळताच परतणार असे बहुतांश नागरिकांनी सांगितले.
दक्षिणेकडील बंगळुरू, चेन्नईप्रमाणेच महाराष्ट्रातून गेल्या तीन दिवसांपासून घरी परतणा-या नागरिकांचा ओघ अद्यापही कमी झालेला नाही. फक्त बंगळुरू शहरातूनच पूर्वोत्तर राज्यांमधील सुमारे 30 हजार नागरिकांना घरची वाट धरली आहे. यामध्ये नोकरदार, विद्यार्थी-विद्यार्थिनी, खासगी कंपन्यांमधील अधिकारी, छोटे-मोठे कामगार यांचा समावेश आहे.
कुणीही मला धमकी दिलेली नाही किंवा शहर सोडण्यासाठी कुणी धमकावलेलेही नाही. केवळ अफवा आणि कर्णोपकर्णी बातम्याच जास्त आहेत, अशा शब्दांत निरंजन मुशाहरी याने रांगिया रेल्वेस्थानकार उतरल्यावर बंगळुरूतील परिस्थिती सांगितली. तो बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत नोकरीला असून उदलगुरी जिल्ह्यातील कोईराबरी गावचा रहिवासी आहे. शनिवारी सकाळी आलेल्या प्रवाशांपैकी 600 नागरिक रांगिया स्थानकावर उतरले. उर्वरित प्रवासी गुवाहाटीकडे रवाना झाले. गोरेश्वर गावचा रहिवासी असलेला रामेन नारझरी हा बंगळुरूमध्ये वॉचमनचे काम करतो. तो म्हणाला, रमजान ईदनंतर आसाम व पूर्वोत्तर राज्यांमधील नागरिकांवर हल्ले करणार असल्याच्या बातम्या कर्णोपकर्णी वेगाने पसरल्यानंतर लोकांमध्ये घबराट उडाली. माझ्या कुटुंबीयांनीही मला फोन करून घरी परतण्यास सांगितले. दरम्यान, कामरूप जिल्हा प्रशासनाने घरी परतणा-या लोकांसाठी खास गाड्यांची व्यवस्था केली होती. बोडो विद्यार्थी संघटनेचे नेतेही त्यांना रिसीव्ह करण्यासाठी रांगिया स्थानकावर आले होते.
गुवाहाटी स्थानकावर रेटारेटी- बंगळुरू, चेन्नईहून विशेष रेल्वे गाड्या गच्च् भरून येताच क्षणी स्थानकावर रेटारेटी होत होती. चेन्नईहून आलेल्या बिश्वजित सहारिया याने सांगितले की गाडीत बसेपर्यंत तरी ईशान्येकडील एकाही नागरिकावर हल्ला झालेला नव्हता. मात्र परिस्थितीच अशी आहे की कुणीही धोका पत्करण्याच्या मन:स्थितीत नाही. मुंबई येथील दंगलीनंतर जास्त घबराट उडाली. बंगळुरूप्रमाणेच हैदराबाद, सिकंदराबाद, पुणे, मुंबई येथूनही हजारो नागरिक आपापल्या घरी परत जात आहेत.
संघ स्वयंसेवकांचा धीर- कर्नाटक, महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ईशान्येकडील नागरिकांना धीर देण्यात येत होता. त्यांना सुरक्षिततेबद्द्ल खात्री देण्यात येत होती.
बंगळुरू, नागपूर, पुणे, हैदराबाद असो अथवा गुवाहाटी रेल्वेस्थानक स्वयंसेवकांच्या वतीने नागरिकांसाठी अन्नाची पाकिटे, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संघाप्रमाणेच अनेक स्वयंसेवी संस्था, बचत गटांनीही या नागरिकांना मदतीचा हात दिला.
- 30 हजार नागरिक एकट्या बंगळुरू शहरातून घरी परतले आहेत.आसाममधील हिंसाचार व त्यानंतरच्या हल्ल्याच्या अफवेमुळे शहरात जलद कृती दलाच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
- 2500 तिकिटे एका दिवसात विकली गेली तरच खास रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात येते. बंगळुरूतून परतणा-या नागरिकांची संख्या कमी झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांप्रमाणे शनिवारी खास गाडी सोडण्यात आली नाही. त्यामुळे सुमारे 100 एक लोक रेल्वेस्थानकावर गाड्यांची वाट पाहत बसले होते.