आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराघरात खंदक बनवा, धान्यसाठा करा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- जम्मू - काश्मीर पोलिसांनी काश्मिरातील नागरिकांना अण्वस्त्र हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी घराघरात बंकर (खंदक) तयार करण्याचे व 15 दिवसांचा अन्नधान्य साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन तसेच गावागावात पोस्टर चिकटवून पोलिसांनी असे आवाहन केले आहे. नागरिकांना असे आवाहन केवळ युद्धकाळात किंवा तशी परिस्थिती असली तरच केले जाते. भारत - पाक संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तशी सूचना करण्यात आल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे.

सिव्हिल डिफेन्स, होमगाड व स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या महानिरीक्षकांच्या वतीने यासंदर्भात स्थनिक दैनिकांमध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी बाजारपेठेत तसे पोस्टर्सही लावले आहेत. पोलिस प्रशासनाने ही प्रक्रिया सामान्य कारवाई असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरी संरक्षण विभागाचे डीआयजी मुबारक गनी यांनी सांगितले की,ही प्रक्रिया नागरी संरक्षण अभियानाच्या वार्षिक तयारीचा एक भाग आहे. नागरी संरक्षण विभागाचे आयजी योगेंद्र कौल यांनी सांगितले की, आम्ही लोकांना जागरूक राहण्यास सांगत आहोत. कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यास त्यांनी सज्ज असले पाहिजे. जास्त तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला.