आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामदेव बाबा व टीम अण्णांत मतभेद; अरविंद केजरीवाल स्टेज सोडून गेले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- परदेशात लपवून ठेवलेला काळा पैसा आणि देशात माजलेला भ्रष्टाचार या दोन समस्यांवर सरकारने त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी आज योगगुरु रामदेवबाबा यांनी केली. अण्णा हजारे यांच्या समवेत प्रथमच दिल्लीतील संसद मार्ग येथे एक दिवसाचे संयुक्त आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आंदोलना दरम्यान एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाविषयी पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. दरम्यान टीम अण्णा आणि रामदेव बाबा यांच्यात आज जाहीर सभेतच मतभेद झाल्याचे चित्र दिसून आले. अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्ट्राचारी १५ मंत्र्यांच्या नावे घेत आपले भाषण संपवले. त्यानंतर रामदेव बाबा यांनी आमचे आंदोलन कोणत्या मंत्र्याविरुद्ध किंवा पक्षाविरुद्ध नाही, असे जाहीर केले. त्यानंतर अरविंद केजरीवाल स्टेजवरुन उठून तडख आपल्या घरी निघून गेले. मात्र त्यानंतर त्यांनी टि्वटरवर सफाई देताना सांगितले की, तब्बेत ठीक नसल्याने मी आंदोलनातून गेलो होतो. रामदेव बाबा व आमच्याच कसलेही मतभेद नाहीत. रामदेव बाबांशी मी लवकरच चर्चा करणार आहे.
आज सकाळी राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अण्णा हजारेंसोबत रामदेव बाबा आंदोलनस्थळी दाखल झाले. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल, किरण बेदी व मनीष सिसोदीया हे टीम अण्णाचे सदस्यही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात अण्णा हजारे व बाबा रामदेव यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आहेत.
यावेळी बोलताना बाबा रामदेव म्हणाले, देशातील करोडो रुपये विदेशात लपवून ठेवले आहेत. त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल तर हा पैसा प्रथम भारतात आणला पाहिजे. हा पैसा देशात परत आणण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. तरच तो पैसा भारतात येणे शक्य आहे. जगभर मंदीची लाट आली आली आहे. आपल्या देशालाही याचा येत्या काळात फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळा पैसा लवकर देशात आणून विकासासाठी व देशहितासाठी त्याचा वापर करावा. असे केले तर मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या सुटू शकतील. तसेच देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सक्षम लोकपाल कायदा लवकरात लवकर आणा अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली.
भारतातील लपवून ठेवलेला काळा पैसाच भारतात विदेशी गुंतवणुकीच्या नावाने येत आहे. त्यामुळे याची माहिती सार्वजनिक केली पाहिजे तसेच संबंधित कंपन्यांनी पैसा कसा उभारला याची माहिती सरकारने घेऊन सार्वजनिक केली पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्ट मंत्री असून, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी चांगल्या व स्वच्छ खासदारांना मंत्रीपदे द्यावीत, असा सल्ला दिला. आयपीएलमध्ये काळा पैसा असून सरकार त्याची चौकशी का करीत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारने गैर प्रकार रोखण्यासाठी काहीही प्रयत्न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करू असे सांगत काँग्रेस व सरकारशी संघर्ष करण्याचे संकेतच रामदेव बाबांनी दिले. टीम अण्णा व अण्णांमुळे आपल्या आंदोलनाला अधिक बळकटी आल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर योगगुरू रामदेव बाबा यांनी केंद्र सरकारपुढे सात मागण्या ठेवल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
- लपवलेला काळा पैसा राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा
- परदेशात लपवून ठेवलेले करोडो रुपये देशात आणा
- कोणत्याही खटल्याचा निकाल एका वर्षात लावा
- एक हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा चलनातून बाद करा
- खटले झटपट निकालात काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करा
- सरकारी कामे वेळीच पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन घाला
- भ्रष्ट्राचारी व्यक्तीस फाशी अथवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करा
PHOTOS: रामदेव बाबा व अण्‍णा हजारेंचे उपोषण सुरू
काळा पैशासाठी ग्रामसभा ते लोकसभेपर्यंत लढाई-रामदेव बाबा
कमी खा; पाणी जास्त प्या - काँग्रेसचा रामदेव बाबांना खोचक सल्ला