आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिका-यांचा त्रास संपणार: भिका-यांचा डाटाबेस तयार करून पुनर्वसनाची योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशभरातील भिका-यांची संख्या जाणून घेण्यासाठी एक डाटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भात देशातील विविध राज्यांचे सचिव, संबंधित विभाग तसेच संघटनांशी चर्चा करून भिका-यांच्या समस्येवर एक सर्वमान्य उपाय शोधला जाणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने ही माहिती दिली. भीक मागण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी देशात भीक प्रतिबंधक कायदा तयार करून त्याच्या काटेकोर अंमलबजावणीचा विचार असल्याचे या अधिका-या ने सांगितले. त्यामुळे देशातील भिका-यांचा त्रास संपण्याची चिन्हे दिसत आहेत.
देशाच्या बहुतांश महानगरांमध्ये भिका-यांची समस्या वाढते आहे. मोठ्या शहरांतील मंदिरे, रस्ते तसेच चौक ही भिका-यांची मुख्य ठिकाणे. या ठिकाणांवर दिसणा-या भिका-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2001 च्या जनगणनेनुसार देशात सुमारे 7 लाख 3 हजार भिकारी होते. त्यापैकी सुमारे 72 हजार भिकारी काही ना काही कामकाज करून गरजेनुसार भीक मागतात, पण 6 लाख 31 हजार भिकारी कोणताही कामधंदा न करता फक्त भिकेवर गुजराण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 11 वर्षांत या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशभरातील भिका-यांचा राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हापातळीवर डाटाबेस तयार केला जाणार आहे. या आधारे भिका-यांचे पुनर्वसन केले जार्ईल. भिका-यांच्या काही टोळ्या महिला तसेच बालकांना जबरदस्ती भीक मागण्यास लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी देशात भीक मागण्यास प्रतिबंध करणारा कायदा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा विचार असल्याचे या अधिका-या ने सांगितले.
भीक मागण्यास प्रतिबंध, भिका-यांना प्रशिक्षण व रोजगार मिळवून देण्यासंदर्भात तत्कालीन मुंबई प्रांताने 1960 मध्ये ‘मुंबर्ई भिक्षा प्रतिबंधक कायदा 1960’ लागू केला होता. अशा कायद्याची देशभरात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
ट्रॅफिक सिग्नल- प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा ‘ट्रॅफिक सिग्नल’ हा चित्रपट याच समस्येवर बेतलेला होता. भिका-यांच्या टोळ्या, भीक मागण्याच्या पद्धती, गुन्हेगारी यासह अनेक विषयांवर या चित्रपटाने भाष्य केले होते.
पुनर्वसनाची योजना- सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अन्य एका अधिका-या ने सरकार भिका-या ंचे पुनर्वसन करण्यासाठी एक ठोस योजना तयार करत असल्याचे सांगितले. अत्यंत हलाखीची आर्थिक स्थिती व विपरीत सामाजिक परिस्थितीमुळे भीक मागण्याकडे वळलेल्या या नागरिकांना या मार्गापासून परावृत्त करत त्यांना पायाभूत शिक्षण व तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल. स्वत:चे व कुटुंबीयांचे पालनपोषण करता यावे यासाठी त्यांना रोजगाराच्या संधीही मिळवून दिल्या जातील. नव्याने तयार होणा-या या श्रमिकांचे श्रम सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वापरले जातील, असेही या अधिका-या ने सांगितले.