आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थींचा हिशेब ठेवणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणा-या प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आधार ओळखपत्राशी जोडून प्रत्येक लाभार्थींच्या खात्यावर जमा होणा-या अनुदानाच्या एकूण रकमेचा सरकार हिशेब ठेवणार आहे. सरकारी योजनांमधील गैरव्यवहार ओळखून त्यांना वेळीच पायबंद घालण्यासाठी तसेच भविष्यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या ठरवण्यासाठी या योजनेतील माहितीचा वापर करता येणार आहे.

कामगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) च्या प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) तसेच पेन्शन स्कीमसह सर्व लाभ ‘डायरेक्ट कॅश ट्रान्सफर’ योजनेअंतर्गत आधार ओळखपत्राशी जोडण्याचा निर्णय याच योजनेअंतर्गत घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ईपीएफओच्या वरिष्ठ अधिका-या ने दिलेल्या माहितीनुसार पीएफ आणि पेन्शन योजनेसह इतर योजनांअंतर्गत नागरिकांना आर्थिक लाभ देण्यात सरकारचे योगदान असते. प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावर किती योजनांचे अनुदान जमा होते हे जाणून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी हे सर्व लाभ आधार ओळखपत्राशी जोडण्यात आले.

सरकार गरजू नागरिकांसाठी विविध योजना राबवते. मात्र काही लाभार्थी एकापेक्षा अधिक योजनांचे लाभ घेत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. उदाहरणार्थ पेन्शन स्कीमचे अनेक लाभार्थी वृद्धावस्था पेन्शनचा लाभही घेत आहेत. योजनेचा लाभ जर लाभार्थींच्या आधार ओळखपत्राशी जोडला तर एकापेक्षा अधिक योजनांचे लाभ घेण्याचे असे गैरप्रकार ओळखून त्यांना पायबंद घालता येणार आहे. त्यासोबतच भविष्यात देशातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची एकूण संख्या जाणून घेण्यासाठी सरकारला या योजनेतून मिळणा-या माहितीचा फायदा होणार आहे.

कामगार मंत्रालयाच्या अधिका-या ने दिलेल्या माहितीनुसार पीएफ तसेच पेन्शन स्कीमसह इतर लाभ आधीच लाभार्थीच्या बँकखात्यात जमा होत असताना, या योजना आधार ओळखपत्राशी जोडण्यामागे नेमका विचार मात्र अद्याप स्पष्ट झालेला नाही. तसेच या योजनांचे लाभ आधार ओळखपत्राशी जोडण्यासंदर्भात कामगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशातही यासाठीचे कोणतेही कारण स्पष्ट केले नसल्याचे या अधिका-या ने सांगितले. ईपीएफओच्या योजनांचे लाभ घेण्यासाठी आधार ओळखपत्र अद्याप बंधनकारक करण्यात आले नसल्याचेही या कर्मचा-या ने सांगितले.

सध्या देशातील फक्त 43 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक पातळीवर ईपीएफओच्या सर्व योजनांच्या लाभार्थींची खाती ‘डायरेक्ट कॅश ट्रान्सफर’ योजनेअंतर्र्गत आधार ओळखपत्राशी जोडण्यात आली आहेत. या योजनांचा लाभ घेणा-या लाभार्थींची कामगार मंत्रालयाकडे असलेली माहिती मंत्रालय सर्व जिल्हाधिका-या ंना उपलब्ध करून देत आहे. तसेच बँकांनाही त्यांच्याकडे असलेली ही खाती आधार ओळखपत्राशी जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.