आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी सेंद्रिय कपड्यांना अधिक पसंती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - रासायनिक खतांनी पिकवलेली शेती व त्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळाली. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळ-भाज्यांना मागणी वाढली असतानाच आता त्यात सेंद्रिय कपड्यांचीही भर पडली आहे. अ‍ॅलर्जीमुक्त, पर्यावरण अनुकूल व टिकाऊपणामुळे देशात अनेक ग्राहक ‘आॅरगॅनिक किड्स वेअर’ची विचारणा करत आहेत.

लोक आरोग्य आणि पर्यावरणाविषयी सजग झाले आहेत. त्यामुळे आजच्या माता कपड्याची निवड करताना काळजी घेत आहेत. कपड्यावरील रासायनिक द्रव्य बाळाच्या त्वचेसाठी अपायकारक ठरेल काय या दृष्टीने त्या विचार करतात, असे आॅरगॅनिक किड्स वेअरमधील नामांकित ब्रॅँड ग्रोन स्टॉकहोल्मचे सीईओ दीपक अग्रवाल यांनी सांगितले. रासायनिक खताच्या वापराशिवाय सेंद्रिय पद्धतीने कापसाचे उत्पन्न घेतले जाते. या कापसापासून तयार केलेल्या कपड्यांसाठी सुरक्षित रसायनांचा वापर केला जातो. कंपनीच्या युरोपातील युनिटकडून कपड्याचे डिझाइन तयार होते, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

ग्रोन स्टॉकहोल्म 10 वर्षांपर्यंतच्या मुलांचे तयार कपडे विकते. येत्या उन्हाळ्यापर्यंत 700 स्टाइल्सचे कपडे आमच्याकडे असतील. पुढील वर्षांपर्यंत 48 कोटीपर्यंत व्यवसाय नेण्याचा उद्देश आहे. ग्रोन स्टॉकहोल्मची सहकारी
संस्था किशोर एक्सपोर्ट आॅरगॅनिक किड्स वेअर उत्पादनातील मान्यताप्राप्त कंपनी आहे. कंपनी युरोप, अमेरिका व जपानमध्ये 1979 पासून कपड्यांची निर्यात करते.

सेंद्रिय कापूस उत्पादनात भारत दुसरा
युरोपमध्ये ऑरगॅनिक किड्स वेअरचे प्रमाण एक तृतीयांश असून भारतात ते नगण्य आहे. युरोपनंतर अमेरिका, ब्रिटन व जपानमध्ये सेंद्रिय कपड्यांना वाढती मागणी आहे. विदेशी ब्रॅँडमुळेही देशात हळूहळू त्याची मागणी वाढत आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. सेंद्रिय कापसाला पाणी कमी लागते. तसेच त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व जैवविविधता टिकली जाते. जगात तुर्कस्ताननंतर भारत 51 टक्के सेंद्रिय कापूस उत्पादनासह दुस-या क्रमांकावर आहे. देशातील सेंद्रिय कापूस विदेशातील टेक्सटाइलसाठी निर्यात केला जातो. कापसाच्या जास्तीच्या भावामुळे येथील उद्योगातून त्याला फारशी मागणी नाही, असे अग्रवाल म्हणाले. कंपनीचे दिल्लीमध्ये दोन व गुडगावमध्ये एक दुकान आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरूसह अन्य काही शहरांत 35 दुकाने उघडण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.