आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्ड फ्लू मेघालयातही, पाच हजार कोंबड्यांची कत्तल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर, शिलाँग - ओडिशामध्ये बर्ड फ्लूच्या उद्रेकानंतर आसपासच्या राज्यातील कोंबड्यांनाही त्याचा संसर्ग झाला आहे. मेघालयातील गारो हिल्स जिल्ह्यातील 5000 कोंबड्यांची बुधवारी कत्तल करण्यात आली तर ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची कत्तल केली जात आहे. मयूरभंज संसर्ग झालेला ओडिशातील दुसरा जिल्हा आहे.
बेतानाती तालुक्यातील बहानदा गावच्या तीन कि.मी. परिघात कोंबड्यांची कत्तल करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत, अशी माहिती या मोहिमेतील केंद्र सरकारचे मुख्य अधिका-याने सांगितले. यातील पहिल्या टप्प्यामध्ये 31 गावांपैकी 4 गावांतील कोंबड्या, बदके आणि अन्य पाळीव पक्षी मारण्यात येतील, असे सांगण्यात येते. पहिल्या टप्प्यामध्ये अंदाजे 5 हजार कोंबड्यांची कत्तल करण्यात येणार आहे. ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यातील केरांग भागातील कोंबड्यांमध्ये एच5एन1 विषाणूचा संसर्ग आढळून आल्यानंतर त्या परिसरातील कोंबड्यांची कत्तल करण्याचे आदेश बजावण्यात आले होते. या ठिकाणच्या 31000 कोंबड्यांना मारण्यात आले.
ईस्ट गारो हिल्समध्ये मोहीम
मेघालयामधील ईस्ट गारो हिल्स जिल्ह्याच्या 25 गावांतील 4600 कोंबड्यांची कत्तल करण्यात आली, अशी माहिती सरकारी अधिका-यांनी बुधवारी दिली. भोपाळच्या पशुरोगनिदान प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेल्या काही कोंबड्यांच्या रक्त नमुन्यामध्ये बर्ड फ्लूचे निदान करण्यात आले आहे.
बुधवारी या परिसरातील 5000 कोंबड्यांना मारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सायंकाळपर्यंत ते पूर्ण होईल, अशी आशा राज्याच्या पशुवैद्यकीय विभागाचे संचालक एल. लांगवा यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार मंगळवारी चार गावांतील 1222 कोंबड्या मारण्यात आल्या. गेल्या आठवड्यामध्ये दीड हजार अंडी नष्ट करण्यात आली, तर 4666 कोंबड्यांची कत्तल करण्यात आली आहे. बर्ड फ्लूच्या एच5एन1 विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे राज्यातील 24,000 कुक्कुट उत्पादनांना नष्ट केले केले जाणार आहे. या भागामध्ये जलद कृती दल 28 जानेवारीपर्यंत सक्रिय राहणार असल्याचे सांगण्यात येते. मोहिमेसाठी 15 तात्पुरते टॉयलेट्स, ब्लॅँकेट्स, पिकअप ट्रक्स, अर्थ मुव्हर्स आदी सामग्री जमा करण्यात आली आहे.