आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP National Conference In Delhi Modi Comment On Congress

काँग्रेस वाळवीसारखी तर मोदी साप-विंचवासारखे; शेवटचा दिवसही ‘मोदीमय’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपणच पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार राहू, असे स्पष्ट संकेत नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. भाजपच्या राष्‍ट्रीय अधिवेशनात शेवटच्या दिवशी मोदींचे भाषण तब्बल 1 तास चालले. विशेष म्हणजे ते केवळ राष्‍ट्रीय मुद्द्यांवरच बोलले. दुसरीकडे, शिवराजसिंह चौहान आणि रमणसिंह या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यांतील यशाचा पाढा वाचला.
काँग्रेसशिवाय मोदींनी सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहनसिंग यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. डॉ. सिंग एक कमकुवत पंतप्रधान असल्याचे सांगून प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते तर देशाची अधिक प्रगती झाली असती, असे ते म्हणाले. काँग्रेस वाळवीसारखी असल्याचे सांगून अवघा देश पोखरला जात असल्याचे मोदी म्हणाले. भाजपच्या अन्य नेत्यांनी केलेली भाषणेही मोदींवर स्तुतिसुमने उधळणारी होती. दरम्यान, मोदींच्या भाषाशैलीवर आक्षेप घेत काँग्रेसने त्यांना खालच्या स्तराचा नेता संबोधले. मणिशंकर अय्यर यांनी तर त्यांना साप-विंचू संबोधून कडी केली. एकंदरीत भाजप नेत्यांची वक्तव्ये आणि काँग्रेसची टिप्पणी पाहता भाजपने 2014 च्या निवडणुकीसाठी नेता निवडल्याचेच स्पष्ट झाले.

पंतप्रधानपदाचा पहिला राउंड मोदींनी जिंकला
भाजपच्या दोनदिवसीय अधिवेशनाची फलश्रुती काय?
2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच भाजपच्या वतीने पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार असतील हे स्पष्ट झाले.
भलेही याची घोषणा झाली नाही, परंतु तसे मानण्याची चार प्रमुख कारणे आहेत...

1. शनिवारी व्यासपीठावर सर्व दिग्गज नेते तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री होते. मात्र, राजनाथ यांनी फक्त नरेंद्र मोदींना हार घालून सत्कार केला.
2. मोदींचा सत्कार सुरू असताना उपस्थित सुमारे 4 हजार प्रतिनिधींनीही जागेवर उभे राहून अभिनंदन केले. विजय गोयल म्हणाले, ‘मोदी पंतप्रधान झालेत असेच वाटत आहे.’
3. रविवारी अडवाणी, सुषमा स्वराज यांच्यासह सर्वांच्याच भाषणांत मोदींचा उल्लेख होत राहिला. अडवाणींनी तर मोदींची तुलना चक्क वाजपेयी यांच्याशी करून टाकली.
4. मोदींचे भाषण मुख्यमंत्री म्हणून नव्हे, राष्‍ट्रीय नेत्यांसारखे होते. त्यांनी सोनिया, राहुल, मनमोहनसिंग यांना लक्ष्य केले. काँग्रेसमधील उपेक्षित नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला.

प्रणव मुखर्जींपासून सीताराम केसरींपर्यंत सर्वांचा उल्लेख का?
०काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाचे दावेदार असलेले अनेक नेते आहेत. मात्र, राहुल यांनाच संधी मिळणार आहे. त्यामुळे मोदींनी काँग्रेसींना नेत्यांविरुद्ध भडकावले. म्हणूनच सीताराम केसरींचे उदाहरण दिले.
०दुसरे कारण म्हणजे, निवडणुकीनंतर राष्टÑपतींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कदाचित म्हणूनच त्यांनी मुखर्जींची स्तुती केली.

काँग्रेस आणि सरकार हेच भाजप नेत्यांचे लक्ष्य
लालकृष्ण अडवाणी म्हणाले, देशाला भ्रष्ट यूपीए सरकारपासून मुक्ती मिळवून देणे हीच खरी सेवा ठरेल.
सुषमा स्वराज म्हणाल्या, तिकीट मिळवण्यासाठी परस्परांवर कुरघोडी करण्याचे सोडून संधीचा लाभ घ्यावा. तरच जनतेला कुचकामी यूपीए सरकारपासून मुक्ती मिळेल.
शिवराजसिंह चौहान म्हणाले, काँग्रेस व यूपीएमध्ये दोन मौनी बाबा बसले आहेत. अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि गंभीर मुद्द्यांवर ते कधीच काही भाष्य करत नाहीत.

काँग्रेसचे ‘टार्गेट’ मात्र केवळ नरेंद्र मोदीच राहिले
मणिशंकर अय्यर म्हणाले, दंगलींचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी देशासाठी साप-विंचवासारखे.
राजीव शुक्ला म्हणाले, गुजरातमधील विजयानंतर मोदींमध्ये अहंकार भिनला. त्यांची भाषा राष्‍ट्रीय नेत्यासारखी नव्हे, गल्लीतील नेत्यांसारखी.
मनीष तिवारी म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी या देशाला मार्ग दाखवला आहे. याउलट मोदी देशाला भरकटायला लावणारे नेते आहेत.

आता पुढे काय?
०नितीश, चंद्राबाबू नायडू यांना विनवण्याची जबाबदारी सुषमा स्वराज यांच्यावर सोपवली जाईल. ०जयललिता स्वत: मोदींशी चर्चा करतील. अडवाणी शिवसेनेला गळ घालतील. अल्पसंख्याकांसाठी पक्षाच्या जाहीरनाम्यांत आश्वासने असतील.

नाइट वॉचमनला काँग्रेसने खुर्चीवर बसवून ठेवले आहे
तगड्या माणसाला काँग्रेसमध्ये उच्च् पद दिले जात नाही. म्हणूनच मनमोहनसिंग यांना नाइट वॉचमनसारखे सत्तेच्या खुर्चीवर बसवले आहे. ज्यांच्यापासून काँग्रेसला धोका वाटतो त्यांची बरोबर विल्हेवाट लागते.

आम्ही असताना काँग्रेस सरकार अजून सत्तेवर कसे?
दिल्लीत सत्ता मिळवणे आव्हान आहे. आम्ही असताना देश देशोधडीला लावणारे सरकार सत्तेत राहते कसे? भाजपकडे मिशन आहे, काँग्रेसची
ओळख मात्र देशात कमिशनमुळेच टिकून राहिली आहे.

नेहरूंनी नव्हे, शास्त्रींनीच स्वाभिमान जागवला
देशात धान्याची कोठारे भरली ती काँग्रेसमुळे नाही. हे लालबहादूर शास्त्रींच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले. नेहरूंच्या काळात बाहेरदेशांतून धान्य खरेदी करावे लागत होते. शास्त्रींनीच शेतकर्‍यांत स्वाभिमान जागवला.

ज्यांनी काँग्रेस सोडली ते नेते पंतप्रधान झाले
मोरारजी देसाई, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग, आय. के. गुजराल, चरणसिंग या नेत्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही. जेव्हा त्यांनी काँग्रेस सोडली, तेव्हा ते पंतप्रधान झाले. काँग्रेसमध्ये एकच कुटुंब सत्ता गाजवू शकते.