आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Seeks Pm's Clarification On Batla House Encounter ‎

बाटला हाऊसप्रकरणी श्वेतपत्रिका काढा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बाटला हाऊस एन्काऊंटरप्रकरणी सुरू असलेल्या चर्चेला भाजपच्या मागणीमुळे वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी ही मागणी केली आहे. बाटला हाऊस एन्काऊंटरप्रकरणी भाजप आणि काँग्रेस सरकारची भूमिका एकच असली तरीही काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी यासंदर्भात वेगळे विधान केल्याने सरकारची अडचण झाली आहे. दिग्विजय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काँग्रेसने उत्तर द्यावे, अशी भाजपची अपेक्षा आहे. त्यामुळेच भाजपकडून याप्रकरणी श्वेतपत्रिकेची मागणी पुढे करण्यात आली आहे. या मागणीच्या आधारे हा प्रचाराचा मुद्दा करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
या सगळ्या घटनाक्रमावर श्वेतपत्रिका काढून जनतेला नेमकी वस्तुस्थिती सांगावी, अशी मागणी जेटली यांनी केली आहे. श्वेतपत्रिका हा सरकारचा विश्वासार्ह दस्तऐवज समजला जातो. भाजप व काँग्रेस निवडणूक प्रचारासाठी हा मुद्दा सोईप्रमाणे वापरू इच्छित आहेत. काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह व केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी याबाबत परस्परविरोधी विधाने केली आहेत. बाटला हाऊस एन्काऊंटर बनावटच होते, परंतु पंतप्रधान व गृहमंत्र्यांना तसे वाटत नाही, असे मत दिग्वििजयसिंह यांनी व्यक्त केले होते. दोन नेत्यांच्या भिन्न मतांच्या आधारे काँग्रेसला पाच राज्यांच्या निवडणुकीत बॅकफूटवर ढकलण्याचा भाजपचा डाव आहे. या मुद्द्याच्या आधारे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत अल्पसंख्याक व मागास मतांचे ध्रुवीकरण करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
एका बड्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात काँग्रेसची स्थिती फार सुधारलेली नाही. राहुल गांधी यांच्या प्रचारसभा, रॅलीचा प्रभाव केवळ टीव्ही चॅनलवरच दिसतो आहे. कारण यादव - मुस्लिम समीकरण समाजवादी पक्षासोबत असून दलितांचा वर्ग बसपासोबत आहे. भाजपसोबत काही उच्चशिक्षित, मध्यमवर्ग व मागास घटक आहेत.