आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोदी महात्म्याची आरती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाजपमध्ये वजन वाढत चालल्याचे स्पष्ट चित्र पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी पाहायला मिळाले. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोंदीचे खास स्वागत करत युरोपीय महासंघही त्यांच्या यशाचे कौतुक करत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

ही बैठक तीन दिवस चालणार आहे. या बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकाबरोबरच 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होणार आहे. भाजपच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील आघाडीचे उमेदवार म्हणून मोदींकडे पाहिले जात आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत सलग निर्विवाद विजय मिळवल्याबद्दल राजनाथसिंहांनी मोंदींचे विशेष कौतुक व अभिनंदन केले. भाजपच्या अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या नावे, असा विक्रम नाही, असे राजनाथसिंहांनी नमूद केले.

पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदींचे खास अभिनंदन केले आहे. त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नवा विक्रम केला आहे. त्यामुळे कार्यकारिणीच्या सर्वच सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, असे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेला सावरण्यात यूपीएला आलेल्या अपयशाबद्दल टीका करतानाच सिंह यांनी मोदींचे पुन्हा अभिनंदन केले. भाजपशासित राज्यांच्या जगभर चर्चा होत आहे. मोदींच्या विरोधी प्रचाराची राळ उडवली जात असताना युरोपीय महासंघ मोदींच्या कामगिरीचा गौरवाने उल्लेख करत आहे, असे राजनाथसिंग म्हणाल्याचे पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

निर्णय संसदीय मंडळ घेईल
राष्ट्रीय कार्यकारिणीत नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली गेल्याने भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण ? असे पत्रकारांनी पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वारंवार हा मुद्दा स्पष्ट केला आहे. मोदींच्या नेतृत्वाचा आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान आहे. सलग तिसर्‍यांदा मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले, शुभेच्छा देण्यात आल्या आणि गौरव करण्यात आला; परंतु भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ योग्य वेळी घेईल, असे प्रसाद म्हणाले.