आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधत्वावर मात करून आंध्रचा तरुण बनला सीए !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - एका 24 वर्षीय तरुणाने अंधत्वावर मात करून चार्टर्ड अकाउंटन्टची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. राजशेखर रेड्डी असे त्याचे नाव असून तो देशातील पहिलाच अंध सीए ठरला आहे.

सीए होणारे अनेक तरूण असतील. परंतु राजशेखरने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. मुळचा गुंटूरच्या या तरूणाने आपल्या शैक्षणिक कामगिरीतून जिद्दीचा प्रवास दाखवून दिला आहे. त्यामुळे तो तरूणांसाठी एक उदाहरण ठरला आहे. त्याला आता फॉच्यून 500 कंपनीमध्ये सीईओ म्हणून काम करण्याची इच्छा आहे. सीए हा व्यावसायिक अभ्यासक्रम धडधाकट असलेल्या अनेक तरूणांना कठीण वाटतो. अशा परिस्थितीत राजशेखर रेड्डीने नवीन इतिहास निर्माण करून आदर्श घालून दिला आहे. राजशेखर जन्मत: अंध नाही. वयाच्या अकराव्या वर्षी त्याला आजारामुळे अंधत्व आले होते. त्यावेळी त्याची दृष्टी गेली होती.

निर्धार आणि संघर्ष - राजशेखरचे वडील सत्यनारायण रेड्डी इलेक्ट्रिशियन आहेत. त्याने दहावीची परिक्षा अंध अवस्थेत दिली. त्यानंतर सीए होण्याचा निर्धार केला. कुटुंब आणि इतर सर्वांनीच त्याला ही गोष्ट शक्य नसल्याचे सांगितले. परंतु शाळेतून त्याला पाठिंबा मिळाला. हैदराबादमध्ये त्याला कोचिंग सेंटरवर जाण्यासाठी सकाळी सहा वाजताच बाहेर पडावे लागे. वाहतुकीची समस्या राजशेखरसाठी संघर्ष होता. त्याचे कोचिंग सेंटर घरापासून खूप दूर होते. त्यावेळी अनेक लोकांनी मला मदतीचा हात दिला. लोकांनी मला रस्ता ओलांडण्यासाठी सहकार्य केले. त्या सर्व हातांचे आपण आभार मानतो, अशी भावना राजशेखरने व्यक्त केली.

आई-वडिलांचे अश्रू हीच माझी प्रेरणा - लहान असताना अचानक दृष्टी गेल्यानंतर वाटले आता सर्व काही संपले. जीवन निराशेच्या गर्तेत अडकले होते. एक वर्षापर्यंत मी घरातच बसून होतो. अगदी एखाद्या दगडाप्रमाणे. माझी अवस्था पाहून आई-वडीलांच्या डोळ्यात अश्रू येत असत. हेच अश्रू माझी प्रेरणा बनले, असे राजशेखरने सांगितले.

आजीमुळे शिक्षण - राजशेखरचे दृष्टी गेली तेव्हा तो पाचव्या वर्गात होता. परंतु आशेचा किरण त्याच्या आजीने आणला होता. त्यांनी दृष्टीहिन मुलांसाठी हैदराबादमध्ये असलेल्या शाळेचा शोध घेतला. त्यानंतर राजशेखरला शाळेत घातले. ही शाळा अंधांसाठीची पहिली इंग्रजी माध्यमातील शाळा होती. हीच शाळा राजशेखरसाठी घर बनली होती.