आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर- शबाना आझमी आणि शर्मिला टागोर या दोघींना आपण ओळखतो ते चित्रपट अभिनेत्री म्हणून. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या दुस-या दिवशी आज शुक्रवारी त्यांनी त्यांना मिळालेल्या कैफी आझमी आणि रवींद्रनाथ टागोरांच्या वैचारिक वारशाचीही ओळख करून दिली.
‘जाराशांको टागोर कुटुंबातील स्त्रिया’ या अरुणा चक्रवर्ती लिखित पुस्तकावरील चर्चेत शर्मिला टागोर व लेखिका सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालक मालाश्री लाल यांनी टागोर स्त्रियांना समानतेची वागणूक मिळे व त्या ख-या अर्थाने सहचरी होत्या, असे विधान केले, त्यावर शर्मिला यांनी तीव्र आक्षेप घेतला. टागोर कुटुंबात कितीही वैचारिक धन असले, बायका शिकलेल्या असल्या, अनेक कला घरी नांदत असल्या तरी पुरुष अधिक वेळ घराबाहेर असत आणि बायकांना एकमेकींचीच साथ होती. एवढेच नव्हे तर रवींद्रनाथांना शांतिनिकेतन उभे करण्यासाठी त्यांची पत्नी मृणालिनी यांनी त्यांचे सर्व दागिने दिले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.
माझ्या आईला पुरुषांसोबत कॉलेजला जायला परवानगी नव्हती, मला माझ्या पतीने चित्रपटात काम करायलाही आडकाठी केली नाही आणि आज माझी मुलगी तिचे सर्व निर्णय स्वत:च घेते. हा बदल इतक्या वर्षांनी होतोय, हे लक्षात घेतले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. ‘सेक्स अँड सेन्सिबिलिटीज इन इंडियन सिनेमा’ या विषयावरील सत्रात बोलताना शबाना आझमी यांनी आजच्या नायिकांना अंगप्रदर्शन करण्याचा निर्णयदेखील पूर्ण विचार करून घेण्याचा सल्ला दिला. तसेच कॅमेरा ज्या पद्धतीने स्त्रीचे शरीर दाखवतो, त्यामागचा उद्देश स्पष्टपणे प्रेक्षकाला कळत असतो, त्यामुळे कॅमे-या मागची दृष्टी बदलणे आवश्यक आहे. शरीरप्रदर्शन म्हणजे स्त्रीत्वाचे सेलिब्रेशन नव्हे, असे त्या ठामपणे म्हणाल्या.
हीरो-अँटिहीरोतील फरक नाहीसा
याच सत्रात गीतकार प्रसून जोशी यांनी सूचित केले की चित्रपट तयार करणा-यांनी त्यांची जबाबदारी ओळखून वागण्याची वेळ आलेली आहे. हीरो आणि अँटिहीरो यांच्यातील फरक आता नाहीसा होत चालल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘आज के हीरो की मोरॅलिटी में गडबड है,’ असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.