आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरवरील उपचारांत पंजाबचे पहिले पाऊल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्करोगाचा अधिसूचित आजारांच्या यादीत समावेश करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले असून, या नव्या नियमानुसार राज्यातील कोणत्याही कर्करोगग्रस्त रुग्णाला हमखास उपचार मिळण्याची व्यवस्था होणार आहे.
मागील आठवड्यात पंजाब सरकारने याबाबत एक अधिसूचना जारी करून राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि नर्सिंग सेंटर्सना आदेश दिले आहेत की, कॅन्सरचा नवा रुग्ण दाखल होताच त्याची माहिती आरोग्य खात्याला देण्यात यावी.
इंडियन कौंसिल आॅफ मेडिकल रीसर्चच्या वतीने संपूर्ण देशातील कॅन्सर रुग्णांची नोंद करण्याची योजना लागू करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे चेअरमन आणि आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स (एम्स) चे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. जी.के. रथ यांनी सांगितले की, देशातील कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या पंजाबमध्ये बरीच मोठी आहे. कॅन्सरला अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट केल्याने राज्यात कॅन्सरवरील उपचार समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांना मिळावेत याची काळजी केंद्र सरकारही घेईल.
या आजाराचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत करण्यासाठी लवकरच इतर राज्यांनाही प्रोत्साहन देण्यात येईल, असेही डॉ. रथ यांनी सांगितले.
आरोग्य मंत्रालयातील एका अधिका-याने सांगितले की, हा नवा कायदा लागू झाल्यामुळे सरकारला सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचारांची व्यवस्था करावी लागेल. खासगी रुग्णालयात दाखल होणा-या कर्करोगग्रस्त नव्या रुग्णांची माहिती
सरकारला देणे आणि रुग्णाकडे पुरेसे पैसे नसल्यास त्याला शासकीय रुग्णालयात पाठवण्याची जबाबदारीही खासगी रुग्णालयांवर असेल. पंजाबमध्ये कॅन्सर रजिस्ट्री तयार करण्यात आली असून, सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांच्या यादीवर खुद्द सरकारचे लक्ष असेल, असेही या अधिका-याने सांगितले.