आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगांच्या कार्यक्षमतेने इंदूरमधील बडे उद्योजक प्रभावित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- इंदूरच्या काही व्यावसायिकांनी अंगीकारलेल्या वेगळ्या दृष्टिकोनाने पाहता पाहता अनेक अपंगांचे आयुष्यच बदलून टाकले आहे. या उद्योगपतींनी अनेक अपंगांना आपल्या कंपनीत रोजगार देण्यास सुरुवात केली असून त्यांच्या कार्यक्षमतेने हे बडे उद्योगपती इतके प्रभावित झाले आहेत की शहराच्या आजूबाजूच्या छोट्या-मोठय़ा कंपन्यांमध्ये अपंगांची मागणी वाढली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, कमिन्स टबरे टेक्नोलॉजी, क्रॉम्प्टन, फ्लेक्जिटफ, प्रतिभा सिंटेक्स, एफर्ट इंडिया लि., इन्फोसिस इंडिया लि. सारख्या कंपन्यांमध्ये असे लोक काम करत असून त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. इंदूर आणि पिथमपूरमध्ये काम करणार्‍या अपंग कर्मचार्‍यांचे वेतन तीन ते तीस हजार रुपये एवढे आहे. पिथमपूरमधील पॉलिथिन बॅगची कंपनी फ्लेक्झिटफने सर्वप्रथम मागील वर्षी डिसेंबरमध्ये 15 अपंगांची नियुक्ती केली. पात्रतेच्या आधारावर त्यांना काम देण्यात आले. या लोकांचे काम पाहून अशा आणखी काही लोकांना रोजगार देण्यात आला. सध्या या कंपनीत 50 पेक्षा जास्त अपंग काम करत आहेत. फ्लेक्झिटफने सुरू केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाची नोंद घेऊन इतर कंपन्यांनीही असे कर्मचारी शोधणे सुरू केले.परिणामी अपंगांना मागणी वाढली.
अपंगांचे सहायक संचालक रोजगार प्रभारी भरतसिंह गौर यांनी सांगितले की, मागील सहा महिन्यांत 30 पेक्षा जास्त कंपन्यांनी हजारांपेक्षा जास्त अपंगांना विविध पदांसाठी नियुक्त केले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने 30 मूकबधिर लोकांची मागणी केली आहे. मौखिक परीक्षेनंतरच अशा लोकांना कामावर घेतले जाते.
इच्छाशक्तीच्या बळावर कामे- एका टाउनशिपमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदावर काम करणारे संतोष मेहरा (पायाने विकलांग) सांगतात, ‘मी जेव्हा काम मागण्यासाठी गेलो तेव्हा मला विचारण्यात आले की, तुम्ही एका पायाने अपंग आहात, मग काम कसे करणार? मी उत्तर दिले, हात किंवा पायांनी काम केले जात नाही तर इच्छाशक्तीवर कामे होतात.’ कंपनीतील वरिष्ठ सेल्स मॅनेजर सुमीत तिवारी सांगतात की, ‘संतोषचे काम प्रशंसनीय आहे. त्याचा कंपनीला फायदाच होत आहे.’
यासाठी मागणी- अपंग लोक सामान्य माणसांपेक्षा जास्त चांगले काम करू इच्छितात. त्यामुळे मन लावून काम करतात. पायाने अपंग असलेले लोक वारंवार उठून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आहे त्या अवस्थेत जास्त चांगले काम करतात. अशा लोकांना कॉल सेंटरमध्ये तसेच बसून काम असलेल्या ठिकाणी जास्त मागणी आहे.