आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cbi Probe Demanded By Parties In Bhandara Rape Case

भंडारा बलात्‍कार प्रकरणी हस्‍तक्षेपास केंद्र सरकारचा नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्‍यातील तीन बहिणींवर बलात्‍कार आणि हत्‍याप्रकरणी राज्‍यसभेत सरकारला घरचाच अहेर मिळाला. खासदार हुसेन दलवाई यांनी सरकारवर निष्‍क्रीयतेचा आरोप केला. तर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेमध्‍ये पीडित मुलींची नावे उघड केल्‍यामुळे गोंधळ झाला. याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्‍यास केंद्र सरकारने नकार दिला असून हा राज्‍याच्‍या अखत्‍यारीतील विषय असल्‍याचे सुशीलकुमार शिंदे यांनी स्‍पष्‍ट केले.

लाखनी तालुक्‍यात गावात तीन सख्ख्या लहान मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्‍यात आलेली नसून पोलिस अंधारातच आहे. याप्रकरणावर आज राज्‍यसभेत गृहमंत्र्यांनी निवेदन दिले. पोलिसांचा तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक होईल, असे पोकळ आश्वासन शिंदे यांनी दिले. परंतु, त्‍यांनी सभागृहात पीडित मुलींची नावे घेतल्‍यामुळे विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. अखेर कामकाजाच्‍या नोंदीतून ही नावे वगळण्‍याचे निर्देश सभापतींनी‍ दिली.

हुसेन दलवाई यांनी या प्रकरणी सरकारवरच तोफ डागली. कनिष्‍ठ अधिका-यांना निलंबित करु काहीही होणार नाही. बडे अधिकारी जागचे हलत नाही. पोलिस अधीक्षकांनाच निलंबित केले पाहिजे, मागणी दलवाई यांनी केली.


भाजपचे राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी लाखनीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राज्याच्या महिला आयोगाला दोन वर्षांपासून अध्यक्ष का नाही, असा सवाल भाजपच्या खासदार स्मृती इराणी यांनी केला आहे. अशा घटना वारंवार घडत असून दोषींना कशाचेच भय उरलेले नाही. या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे, असे इराणी म्‍हणाल्‍या.