आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charges Fixed On 5 Accused In Delhi Gang Rape Case

दिल्‍ली सामुहिक बलात्‍कारप्रकरणी 5 नराधमांविरुद्ध 13 आरोप निश्चित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानीत 16 डिसेंबरला बसमध्ये झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी न्यायाधीश योगेश खन्ना यांनी 5 नराधमांविरुद्ध आरोप निश्चित केले. भारतीय दंड संहितेच्या 13 कलमान्वये फास्टट्रॅक कोर्टात हे आरोप लावण्यात आले.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला अत्याचाराविरुद्ध कायद्यातील दुरुस्तीचा अध्यादेश शुक्रवारी मंजूर केल्यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. महिला संघटना मात्र अजूनही समाधानी नाहीत. ही उपाययोजना पुरेशी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बसचालक रामसिंह, त्याचा भाऊ मुकेश, फळ विक्रेता पवन गुप्ता, जिम इन्स्ट्रक्टर विनय शर्मा आणि बसचा क्लिनर अक्षय ठाकूर या आरोपींवर हत्या, सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, पुरावे नष्ट करणे, हत्येचा प्रयत्न, अपहरण, गंभीर जखमी करणे, लूट करून हत्या असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

प्रकरणाची औपचारिक सुनावणी व साक्षीदारांचे जबाब घेण्याचे काम मंगळवारपासून सुरू होईल. फास्ट ट्रॅक कोर्टात 21 जानेवारीला सुनावणी सुरू झाली. पोलिसांनी दाखल केलेल्या सुमारे 1 हजार पानी आरोपपत्रात पीडित मुलीचा जबाब, आरोपींची माहिती, पुरावे आणि न्यायवैद्यक शाखेचा अहवाल याचा समावेश आहे.

पीडितेचे कुटुंब समाधानी - बलात्कार व खूनप्रकरणी आरोपींना फाशीची तरतूद करणार्‍या अध्यादेशाचा निर्णय केंद्राने घेतल्याने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. तरुणीच्या भावाने हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. या अत्याचारात सहभागी असलेल्या अल्पवयीन तरुणालाही सज्ञान मानून खटला चालवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणीही भावाने केली.

प्रकरण काय? - गेल्या 16 डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास दिल्लीत मुनारिका स्टँडवर एक 23 वर्षीय तरुणी मित्रासह बसमध्ये चढली. बसमध्ये या वेळी सहा जण बसलेले होते. या नराधमांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. अत्यंत निर्दयीपणे तरुणी व तिच्या मित्राला मारहाण केली. दोघांनाही चालत्या गाडीतून ढकलून दिले. तरुणीचा सिंगापुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रारंभी सफदरजंग रुग्णालयात व नंतर सिंगापूर येथे उपचारार्थ हलवण्यात आले. मात्र, घटनेनंतर 13 दिवसांनी तिची प्राणज्योत मालवली. सर्व आरोपींना 17 ते 21 डिसेंबरदरम्यान अटक करण्यात आली.

कोरियन तरुणीवर बलात्कार प्रकरण; मध्य प्रदेशात रिसॉर्ट मॅनेजर अटकेत - उमरिया जिल्हय़ातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात कोरियन तरुणीवर बलात्कारप्रकरणी आरोपी रिसॉर्ट मॅनेजर दीपक विश्वकर्मा यास पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात तरुणीने तक्रार केली होती. औरंगाबाद पोलिसांसोबत आलेल्या तरुणीने ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले. आरोपी दीपक याने गुन्हा कबूल केला आहे.