आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छत्तीसगडमध्ये तुघलकी फर्मान, नोकरी करणा-या मुलीवर बहिष्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैकुंठपूर - छत्तीसगडमधील वैकुंठपूर येथील बरदिया गावच्या पंचायतीने धोबी समाजातील महिलेविरुद्ध तुघलकी फर्मान सुनावले आहे. बरदिया गावातील धोबी बुधुलाल रजक यांची मुलगी पिंकी हिने एका शाळेत सफाई कामगाराची नोकरी स्वीकारल्यामुळे धोबी समाजाने तिला आणि तिच्या पूर्ण कुटुंबाला 60 वर्षांसाठी बहिष्कृत करण्याची शिक्षा सुनावली आहे. कुटुंबाचे हुक्कापाणी बंद होऊ नये म्हणून तिला नोकरीचा राजीनामा देण्याचा आदेशही सुनावण्यात आला आहे.
वैकुंठपूरमधील पटना पोलिस स्टेशनच्या हद्दीत बरदिया हे गाव येते. येथील पिंकीचे लग्न 2006 मध्ये ओदारी गावातील कपिल देव याच्याशी झाले. दारू आणि जुगाराच्या व्यसनाधीनतेमुळे चार वर्षातच कपिल बेकार झाला. पिंकीला मारहाणीचे प्रकार सुरू झाले. नव-याच्या त्रासाला कंटाळून पिंकी पुन्हा माहेरी परतली. घरी वडिलांना ओझे नको म्हणून नोकरीचा शोध सुरू केला. बरदिया गावातच एका सरकारी शाळेत सफाई कामगाराचे काम मिळाले. धोबी समाजातील महिलेने सफाई कामगाराचे काम करणे धोबी समाजाला पटले नाही. त्यामुळे समाजाचे प्रदेश अध्यक्ष सूरज निर्मलकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
सभा बोलावून शिक्षा सुनावली
छत्तीसगडमधील धोबी समाजाचे वैकुंठपूर येथील जिल्हाध्यक्ष दलसाय रजक आणि अन्य पदाधिकारी बुधुलालच्या घरी पोहोचले. त्याच्याच घरी सभा बोलावून पिंकीला नोकरी सोडायला लावण्याचे आदेश देण्यात आले. 27 मे रोजी पटना गावात पुन्हा सभा बोलावून निकाल घोषित करण्यात आला. रायपूरमधील मोतीबाग येथे 17 जून रोजी या प्रकरणावर पुढील बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कुटुंबावर संकट
बुधुलाल यांच्या कुटुंबात पिंकीव्यतिरिक्त तीन मुली आणि एक मुलगा आहे. धोबी समाजाच्या बहिष्कारामुळे उर्वरित मुला-मुलींचे लग्न होणे अशक्य आहे. नाइलाजाने जातीबाहेर लग्न करावे लागू शकते, असे बुधुलाल यांनी सांगितले.
मुलीला आईचा पाठिंबा
समाजाने बहिष्कार टाकला तरी पिंकीची आई रामबाई तिच्या पाठिशी उभी आहे. काहीही झाले तरी पिंकी सरकारी नोकरी सोडणार नाही, असा निर्धार
त्यांनी केला आहे.
अशी सुनावली शिक्षा
60 वर्षांसाठी कुटुंबावर हुक्काबंदी
कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न होणार नाही
कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
सासरच्यांकडूनही धमकी
पिंकीला सरकारी नोकरी लागल्याची बातमी मिळताच सासरकडील मंडळी तिला परत घेऊन जाण्यासाठी आली. मात्र, समाजाने बहिष्कार टाकल्याचे कळताच पिंकीला नोकरी सोडण्याचा सल्ला देण्यात आला. पिंकीने नकार दिल्यावर तिला सोडून देण्याची धमकी देण्यात आली.