आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेडे पाहिलेही नाही, पण टीव्हीवर साकारले अस्सल ग्रामीण जीवन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली, मुंबई, कोलकाता व बंगळुरूच्या या तरुणींनी अद्याप चाळिशीही गाठलेली नाही. खेडी चित्रपटांतच पाहिलेली आहेत; पण कल्पकता व सवरेत्तम टीमच्या बळावर त्या दरवर्षी 1200 कोटींपेक्षा जास्त उलाढालीच्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या टीव्ही मालिकांची निर्मिती करत आहेत. हेमंत शर्मा यांचा रिपोर्ट.
नवी दिल्ली- येथून विज्ञान शाखेची पदवी घेऊन दहा वर्षांपूर्वी नीलिमा वाजपेयी मुंबईत आल्या. त्या वेळी पुढील काही वर्षांतच आपण टीव्ही मालिकांची सम्राज्ञी एकता कपूरला आव्हान देत ‘तुलसी’ व ‘पार्वती’च्या तोडीस तोड ‘अम्माजी’ नावाचे एक अस्सल ग्रामीण बाजाचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू, असे त्यांच्या स्वप्नातही आले नसेल. महानगरांमधून आलेल्या व मालिकांमधून ग्रामीण चित्र उभे करणार्‍या या तरुणीच आज टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत.

राजस्थानच्या गावातील कथा एका अगदी नव्या चॅनेलच्या माध्यमातून टीव्हीच्या दर्शकांपर्यंत पोहोचवणार्‍या कोमल वाधवा यांपैकीच एक. कलर्स चॅनेलच्या यशात त्यांच्या ‘बालिका वधू’ या मालिकेचा सिंहाचा वाटा आहे. फर्निचर डिझायनर व निर्यातदार असलेल्या कोमल यांनी पती संजय वाधवा यांच्या जोडीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. कलात्मक व व्यावसायिक जबाबदार्‍या पतीकडे सोपवत निर्मिती व वेशभूषेची जबाबदारी स्वत:कडे घेतली. त्यांचे राजस्थानी गावाचे सेट इंडस्ट्रीत मैलाचा दगड ठरले. अन्य चॅनल्सनाही ग्रामीण कथांमध्येच नफा शोधावा लागला. ग्रामीण पार्श्वभूमीच्या मालिकांचे र्शेय बालिका वधूकडेच जाते. मालिकेचे लेखक राजेश दुबे यांच्या मते सुरेखा सीकरी यांनी साकारलेली ‘दादी सा’ अन्य ग्रामीण भूमिकांसाठी आदर्श ठरली आहे. यानंतर टीव्ही मालिकांमध्ये अशा भूमिकांचे पीक आले.

तज्ज्ञांच्या मते जनरल एंटरटेनमेंट चॅनेल ‘कलर्स’च्या कार्यक्रमांनी ग्रामीण भारत थेट मुंबईच्या स्टुडिओत पोहोचवला. पुरुषप्रधान असलेल्या या इंडस्ट्रीत कलर्सच्या तत्कालीन प्रोगॅ्रमिंग हेड व मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या अश्विनी यार्दी यांनी नव्या विचारांच्या या शहरी तरुणीकडून ग्रामीण जीवनाचे चित्रण असलेल्या मालिका तयार करून घेतल्याच, शिवाय टीआरपीची महागडी व अत्यंत तणावाची स्पर्धा जिंकून घेण्याचे प्रयोगही केले.

झी टीव्हीसाठी ‘बनूँ मैं तेरी दुल्हन’ मालिकेच्या 400 पेक्षा अधिक भागांची निर्मिती केलेल्या नीलिमा वाजपेयींनी सादर केलेल्या ‘अम्माजी’ या भूमिकेने वृत्तवाहिन्यांचे संपादक व दिग्गज पॉलिटिकल अँकर्सही प्रभावित झाले व मुलाखत घेण्यासाठी गर्दी करू लागले. नीलिमांसाठी मात्र यशाचे सूत्र काही वेगळेच होते- मालिकांमधून दिसणारा नवरा असा असावा जो वास्तविक जीवनात कोठेही दिसणार नाही. एक असा नवरा जो पत्नीसाठी काहीही करण्यास मागे-पुढे पाहणार नाही व मालिका पाहणार्‍या स्त्रिया त्या भूमिकेवरून जीव ओवाळून टाकतील. मालिकेतील पत्नीची भूमिकाही एवढी प्रेमळ असावी की मालिका पाहणार्‍या प्रत्येक पुरुषाला अशाच पत्नीचे स्वप्न पडेल. अशा रीतीने आम्ही स्वप्नाचीच निर्मिती करतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

‘प्रतिज्ञा’सारख्या अत्यंत लोकप्रिय मालिकेची निर्मिती करणार्‍या पर्ल ग्रे असो किंवा ‘भागोवाली’ची कल्पना सुचवणार्‍या किन्नरी मेहता असो; ‘गुची’च्या पर्स व ‘झारा’ची जीन्स परिधान केलेल्या या महिला ग्रामीण जीवनाचे चित्रण ज्या प्रकारे साकारतात ते अन्य कोणत्याही व्यवसायात पाहण्यास मिळत नाही. नवी दिल्लीच्या लेडी र्शीराम महाविद्यालयातून दहा वर्षांपूर्वी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या शिखा विज यासुद्धा ‘बालिका वधू’ व ‘गुलाल’ या मालिकांच्या क्रिएटिव्ह हेड म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
उज्जैनपासून शेकडो किलोमीटर दूर बसून ममता पटनायक यांनी कलर्सच्या ‘हवन’ मालिकेला आकार दिला. हीच बाब ‘बेटियाँ’च्या लेखिका व क्रिएटिव्ह हेड दामिनी शेट्टी यांच्यातही पाहायला मिळते. मुंबईत बसून त्यांनी वृंदावनची ‘छोटी बहू’ साकारली. अनेक मालिकांचे क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केलेले दीपक पचौरी यांच्या मते या तरुणींच्या कामातील वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कल्पना विस्तारासाठी चित्रपटांचा आधार घेतला. ग्रामीण कथा थेट टीव्हीवर सादर करण्यास त्यांनी जराही मागे-पुढे पाहिले नाही.

टीव्हीवरील कार्टून मालिका बच्चे कंपनीला घालताहेत भुरळ; अनुकरणावरही देताहेत भर