जयपूर- काँग्रेसच्या नेत्यांनाच विश्वास नाही की काँग्रेस पक्ष आपल्या बळावर पुन्हा सत्ता हस्तगत करील. काँग्रेस चिंतन शिबिरात सहभागी होण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी वरील वक्तव्य केले आहे.
रमेश म्हणाले, काँग्रेस पक्ष बळकट करण्याची गरज आहे. येत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करु शकत नाही. पक्ष संघटना पातळीवर रचनात्मक बदल आणि काम करण्याची गरज आहे.
दरम्यान, रमेश यांच्या वक्तव्यावर बसपाच्या मायावती यांनी यात नवे काय आहे असे म्हणत टीका केली आहे. काँग्रेसने रसातळाला चालली असून गेल्या २०-२२ वर्षापासून काँग्रेस स्वबळावर कधीही सत्तेत आली नाही. भविष्यातही येऊ शकणार नाही. काँग्रेसने यूपीए या आघाडीची स्थापना केली असून त्याद्वारेच ते सत्तेत आहेत. इतर पक्षाच्या मदतीमुळेच काँग्रेस सध्या सत्तेत आहे.
काँग्रेस आघाडीत बिजू जनता दल आणि नितीशकुमार यांचा जनता दल (यूनायटेड) येत्या निवडणूकीत सामील होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी याबाबत थांबा आणि पाहा हे धोरण योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाने 'एकला चलो रे' चे धोरण राबवावे अशा मतापर्यंत राहुल गांधी आले आहेत. सहकारी पक्षांची मदत घेतल्यामुळे पक्षवाढीला मर्यादा येत आहेत, असे राहुल गांधींना वाटते.
ऱाहुल गांधींनी पंतप्रधान व्हावे- काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान बनावे ही काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे मत दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले.