आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्र्यांच्‍या वक्तव्‍यावरुन कॉंग्रेस-भाजप आमनेसामने, याचिकेवर आज सुनावणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/भोपाळ- केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आणि भाजपबाबात खळबळजनक वक्तव्‍य केल्‍यानंतर कॉंग्रेस आणि भाजप नेत्‍यांमध्‍ये शाब्दिक जुगलबंदी सुरु झाली आहे. मध्‍य प्रदेशचे कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्ष कांतिलाल भुरिया यांनी आरएसएसची तुलना तालिबानशी केली आहे. तर भाजपचे नेते विश्‍वास सारंग यांनी शिंदेंचे आयएसआयसोबत संबंध असल्‍याचा आरोप केला आहे. दरम्‍यान, शिंदे यांच्‍या वक्तव्‍याच्‍या विरोधात दाखल करण्‍यात आलेल्‍या याचिकेवर आज सुनावणी आहे.

भुरिया यांनी खंडव्‍याजवळ आयोजित एका शेतकरी संमेलनात आरएसएसवर टीका केली. ते म्‍हणाले, संघाच्‍या लोकांचा देशातील कायद्यावर विश्‍वास नाही. ते समाजात दुही निर्माण करण्‍याचे काम करतात. महूमध्‍ये बॉम्‍ब बनविण्‍यापासून समझौता एक्‍स्‍प्रेसमध्‍ये स्‍फोट घडविण्‍यापर्यंत संघाच्‍या लोकांचा सहभाग आहे. गृहमंत्र्यांचे वक्तव्‍य सत्य आहे. तसेच केंद्रीय गृहसचिवांनी सांगितलेल्‍या 10 जणांपैकी 5 जण मध्‍य प्रदेशातील आहेत. याचाच अर्थ मध्‍य प्रदेशातील भाजप सरकारही दहशतवादी कारवायांमध्‍ये गुंतलेल्‍यांना आश्रय देत असल्‍याचा आरोप भूरिया यांनी केला. भूरिया यांच्‍या वक्तव्‍याचा भाजपने निषेध केला आहे.

भाजपचे एक नेते विश्‍वास सारंग यांनी पलटवार करताना सुशीलकुमार शिंदे यांच्‍यावर आयएसआयसोबत संबंध असल्‍याचा आरोप केला आहे. शिंदे यांनी भाजप आणि संघावर हिंदू दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे चालवित असल्‍याचा आरोप केला. परंतु, शिंदे यांच्‍या बेजबाबदार वक्तव्‍याचा दहशतवाद्यांचा म्‍होरक्‍या हाफीज सईद शिंदे यांच्‍या वक्तव्‍याचा आधार घेऊन आंतरराष्‍ट्रीय पातळीवर भारताला दहशतवादी राष्‍ट्र घोषित करण्‍याची मागणी करीत आहे. त्‍यामुळे शिंदे यांच्‍या वक्तव्‍याची चौकशी करावी आणि त्‍यांची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी सारंग यांनी केली.

शिंदे यांनी कॉंग्रेसच्‍या चिंतन शिबिरात केलेल्‍या वक्तव्‍याविरोधात याचिका दाखल करण्‍यात आली आहे. शिंदे यांच्‍या वक्तव्‍यामुळे हिंदूच्‍या भावना दुखावल्‍याचे याचिकेत म्‍हटले आहे. तसेच अशा वक्तव्‍यामुळे दोन समुदायांमध्‍ये द्वेष पसरू शकतो, असेही याचिकेत म्‍हटले आहे.