आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Chinatan Shivir: How To Win When We Battle Among Us

कॉँग्रेसचे चिंतन शिबीर : आपसात लढत राहिलो तर जिंकणार तरी कसे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - कॉँग्रेसच्या तीनदिवसीय चिंतन शिबिराला जयपूरमध्ये शुक्रवारी प्रारंभ झाला. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी उद्घाटनपर भाषणात चिंता व्यक्त करतानाच अपयशांचा पाढाही वाचला. फोफावलेला भ्रष्टाचार, महिला सुरक्षा तसेच मध्यमवर्गीयांमध्ये सरकारबद्दल निर्माण झालेली उपेक्षा हे मुद्दे गांभीर्याने मांडले. नेत्यांचे वाद सरकारला अडचणीचे ठरल्याचे त्या म्हणाल्या. तसेच युवा पिढीसोबत भारताबरोबर आता आपल्याला बदलावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. पक्ष व संघटनेत 30 टक्के जागा युवकांना देण्यावरही शिबिरात चर्चा झाली.

पहिले अपयश : निसटता जनाधार
महत्त्व : उत्तर प्रदेशात सपा-बसपाने कॉँग्रेसची मते फोडली.
मागास जमातीही दूर गेल्या. बिहारमध्ये जनाधारच नाही. कर्नाटकात पारंपरिक मते भाजपकडे गेली. गुजरातेत मोदींनी सुरुंग लावला.
उपाय काय : निवडणुकीपूर्वी वर्षात मागास व अल्पसंख्यकासाठी योजना.
दुसरे अपयश : वाढता भ्रष्टाचार
महत्त्व : पक्षाचे अनेक मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. यामुळे अण्णा, केजरीवाल आणि बाबा रामदेव यांच्यासारख्या लोकांनी देशभरात काँगे्रस पक्षाविरुद्ध रान उठवले आहे. रॉबर्ट वढेरा यांच्यावरही आरोप झडले. लोकपालची मागणी होतच राहिली, मात्र कायदा झाला नाही. उत्तरदायित्वासारखे काही प्रकरणा नाही.
उपाय काय : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार लोकपाल विधेयक आणू शकते. भ्रष्टाचार रोखण्यासाठी नवीन तंत्र आणि तंत्रज्ञानावर चर्चा होईल. प्रशासनासंबंधित अनेक नव्या सुधारणांची घोषणा शक्य आहे.
तिसरे अपयश : महिलांवरील वाढते अत्याचार थांबवता न येणे :
महत्त्व : दिल्ली सामूहिक अत्याचारानंतर झालेल्या आंदोलनाने सरकार आणि पक्षाला हादरवून सोडले आहे. वाढत्या गुन्ह्यांचे खापर सरकारवरच फोडले जात आहे. गरजांनुसार कायदे नसल्याबद्दल सरकारवर प्रश्नचिन्ह. जनतेच्या आक्रोशावर वक्तव्यांची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न.
काय होईल : चिंतन शिबिरात महिलांच्या सुरक्षेवर सरकारचा नवा अजेंडा तयार होईल. महिलांची भागीदारी वाढवण्यावर चर्चा. मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी नव्या कार्यसंस्कृतीवर भर. नवे कायदेशीर उपाय सूचवले जातील.
चौथे अपयश : सोशल मीडियाच्या आव्हानात स्वत:मध्ये परिवर्तन करता न येणे.
महत्त्व : गेल्या काही आंदोलनांत फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. पहिल्यांदा बंदचे आव्हान सोशल मीडियाच्या माध्यमातूनच झाले होते. सरकारला या सोशल नेटवर्किंग वर्गाने भलतेच भंडावून सोडले.
काय करणार : सरकारही आता ‘सोशल मीडिया फ्रेंडली’ होणार. सोशल मीडियाचा वापर करून आपले म्हणणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा सरकार आणि पक्षात तयार होणार.
पाचवे अपयश : चांगल्या कामांचा फायदा उचलता न येणे.
महत्त्व काय : गुजरात, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगडसारख्या अनेक राज्यांत केंद्रांच्या चांगल्या योजनांचे श्रेय तेथील राज्य सरकारांनी लाटले आहे. काँग्रेस संघटनेतील नेते या आपल्याच योजना आहेत, असे ठसवून सांगण्यात अपयशी ठरले आहेत.
काय करणार : पक्षात मॉनिटरिंग सिस्टिमचे नवे तंत्र तयार होईल. राहुल गांधी यांनी युवक काँगे्रसमध्ये तयार केलेल्या ‘सर्वसामान्यांचा सेवक’ या मॉडेलचा मूळ संघटनेत अवलंब केला जाईल.
शेवटी हे राहिलेच :
महागाईवर तोंड बंद : सोनिया गांधी यांनी वाढत्या महागाईबद्दल अवाक्षरही काढले नाही. उलट पक्षनेते आणि कार्यकर्त्यांना याचीच मोठी चिंता लागून राहिलेली होती.
चिंतन कशावर?
* तिस-यादा सत्ता कशी मिळवायची?
* पारंपरिक मते कशी वाचवायची?
* पुढील निवडणुकीत नेतृत्व कुणाचे?
* राहूल गांधींची भूमिका काय?
चिंता कुणाची?
* 9 वर्षांतील नाराजी कशी काढणार?
* भ्रष्टाचार : आरोपांना तोंड कसे देणार?
* नेत्यांचा गर्व कसा घालवायचा?
* जनतेचा दुरावा कसा कमी करणार?
नेत्यांना धडे
* आता वैयक्तिक फायदा सोडून एकत्र काम करण्याची वेळ आली आहे.
* एकत्र काम न केल्याने आम्ही अनेक संधी आजवर गमावल्या आहेत.
* सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानात पारंगत नव्या पिढीकडे दुर्लक्ष नको.
नेतृत्वाचे कौतुक
* नववर्षात यूपीए सरकारने देशाचा गतिमान विकास साध्य केला.
* शेतक-याच्या हिताला नेहमी प्राधान्यक्रम दिला आहे.
* मनरेगा, राइट टू एज्युकेशन, कॅश फॉर सबसिडी अशा योजना दिल्या.
विचारमंथन राहुल यांच्या नेतृत्वाबाबत
*पाच मुख्यमंत्री, सात केंद्रीय मंत्री, पाच राज्यांचे 12 मंत्री आणि पक्षातील 22 बड्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्त्व यावर भर दिला. 2014 ची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली व्हावी, असा आग्रह धरून राजू शुक्ला व राज बब्बर यांनी राहुलना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून तत्काळ घोषित करावे, अशी मागणी केली. मुरली देवरा यांची मात्र यावर सहमती नव्हती.