आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआझमगढ/लखनऊ- केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 'हिंदू' दहशतवादावरील वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर भाजपने आता शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या संघटनांवरील बंदीचा संदर्भ देऊन सांगितले की, या संघटनांवर बंदी घातली, त्यावेळी आम्ही 'मुस्लिम दहशतवाद' असा कधीही उल्लेख केला नाही. दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो.
स्टूडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या संघटनेवर अजूनही बंदी आहे. सिमीचे माजी अध्यक्ष डॉ. शाहिद बद्र फलाह हे बंदीविरोधात न्यायालयात लढत आहेत. त्यांच्या नजरेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा कॉंग्रेस अनेक पटींनी धोकादायक आहे. कॉंग्रेसच्या शासनकाळात मुस्लिमांची अवस्था अतिशय हलाखीची झाली आहे. कॉंग्रेसने नेहमी मुस्लिमांसोबत विश्वासघात केला, असे फलाह म्हणतात.
'दैनिक भास्कर'चे प्रतिनिधी राहुल पांडे यांनी त्यांच्यासोबत काही विषयांवर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. ते महणाले, समाजावादी पार्टीने सिमीवर बंदीविरोधात भूमिका घेतली. परंतु, जो पक्ष सत्तेत आहे, त्यांना ते पाठींबा देतात. या पक्षाने बंदीविरोधात निर्णय दिला नाही. त्यामुळे समाजवादी पार्टीची दुतोंडी भूमिका दिसून येते.
दहशतवादासंदर्भात फलाह म्हणाले, दहशतवादी आणि दहशतवाद्यांची परिभाषा सर्वप्रथम स्पष्ट करायला हवी. मंदिर असो किंवा मस्जिद, कुठेही स्फोट झाला, तरी आम्हालाच विचारण्यात येते. मुस्लिम ओरडून सांगतात की दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. तरीही मुस्लिमांकडेच बोट दाखविण्यात येते. त्यांना न्यायालयात हजर केले जाते तेव्हा लोक त्यांना मारतात. कोणीही वकील त्यांची बाजू मांडण्यासाठी उभा राहत नाही. जो उभा राहतो, त्याला मारहाण होते. याऊलट, प्रज्ञा ठाकूर किंवा कर्नल पुरोहित न्यायालयात हजर होतो, त्यावेळी त्यांचे हारफुलांनी स्वागत होते. मुस्लिमच दहशतवादी आहे, हे कुठेतरी लोकांच्या मनात रुतलेले आहे.
दहशतवादाची माझ्या मते परिभाषा अशी की, समोरच्या व्यक्तीला धमकावून किंवा भीती दाखवून केलेले कोणतेही कृत्य दहशतवाद आहे. न्यायपालिका निर्णय घेते. इस्लाम मानतो की, शिक्षा देण्याचा अधिकार न्यायपालिकेला आहे. आज जनता वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादाला तोंड देत आहे. एका अर्थाने जनतेवर सत्तेचा दहशतवाद लादला जात आहे. सिमीवर बंदी हा सत्तेचाच दहशतवाद आहे. या माध्यमातून मुस्लिमांमध्ये दहशत पसरविण्याचे काम होत आहे.
मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाबाबत फलाह म्हणतात, या देशासाठी सर्वाधिक त्याग मुस्लिमांनीच दिला आहे. इंग्रजांच्या विरोधात मुस्लिमांचेच प्राण गेले आहेत. टीपू सुल्तान जेव्हा इंग्रजांविरोधात लढत होता, त्यावेळी कोणी गद्दारी केली, हे जगाला माहिती आहे. आरएसएसने कोणताही त्याग केलेला नाही. तरीही त्यांनीच देशावर हक्क दाखविला आहे.
कसाबच्या फाशीबद्दल त्यांनी सांगितले की, इस्लाममध्ये दहशतवादाला थारा नाही. पाकिस्तान असे करीत असल्यास ते चुकीचे आहे. देशात न्यायपालिका काम करीत आहे. कसाबच्या विरोधात पुरावे होते. त्यामुळे त्याला फाशी दिली. कसाबच काय तर इतर अनेक जण फाशीच्या रांगेत आहेत. न्यायपालिकेला काम करु द्यावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.