आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी उपाध्यक्ष, काँग्रेस ‘चिंता’मुक्त!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - काँग्रेसच्या चिंतन शिबिरात दुसर्‍या दिवशी शनिवारी राहुल गांधी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आगामी काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. पक्षाच्या कार्यकारी समितीने ही निवड केल्याची घोषणा रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली आणि राहुल औपचारिकरीत्या काँग्रेसचे ‘नंबर 2’ नेते झाले.

राष्ट्रीय स्तरावर आजवर काँग्रेसमध्ये उपाध्यक्षपद नव्हते. खास राहुलसाठी या पदाची निर्मिती करण्यात आली. यापूर्वी 1986 मध्ये अर्जुनसिंह यांना हे पद देण्यात आले होते. पक्ष प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी पक्षाच्या निर्णयांची माहिती दिली.
सायंकाळी सात वाजता सुरू झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ए. के. अँटनी यांनी राहुल यांना उपाध्यक्षपद देण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडला. सर्वच सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले. यानंतर सोनिया गांधी यांनी निर्णयाची घोषणा केली. राहुल यांनीही ही जबाबदारी स्वीकारली आहे.

सोनियांनंतर ‘नंबर 2’ नेते ; अप्रत्यक्ष सूत्रधार

राहुल यांची भूमिका
०पक्षाची सूत्रे अप्रत्यक्षपणे
राहुलच्याच हाती राहतील.
०पक्षाचे सर्व नेते राहुल यांना माहिती देण्यास बांधील.
०निवडणुकीसंबंधी महत्त्वाचे निर्णय राहुल यांना घ्यावे लागतील.

चिंतन आणि चिंतेचे हे विषय
1. सरकार-पक्षात ताळमेळ : आर्थिक आघाडी सरकारसाठी प्राधान्याचा मुद्दा. डिझेल दर, रेल्वेभाडेवाढ, अनुदानकपात हवी असल्याचे मत. परंतु जनता दुरावेल, अशी पक्षाची चिंता.
2. महिला अत्याचार : सोनियांचा प्रत्यक्ष सहभाग. बलात्कारातील आरोपींना फाशीच दिली जावी, असे अनेक प्रतिनिधींचे मत.
3. महागाईचा मुद्दा : महागाईचा मुद्दा पक्षाने पहिल्यांदा विचारात. पक्ष, सरकार पातळीवर नियंत्रण कठीण असल्याचे मत. मुद्दा समोर आणणे घातक ठरू शकते, असे मत आले.

भाजपचे आरोप
नाव चिंतनाचे, पण राहुलना ‘प्रोजेक्ट’ करण्याचे काम.
काँग्रेसची घराणेशाही कायमचीच, मग राहुलच्या पदाचा गवगवा कशाला हवा?
9 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आताच युवकांची आठवण काँग्रेसला का झाली?


कुत्री-मांजरासारखे भांडतात
जयपूर/नवी दिल्ली - भाजप नेते पदासाठी कुत्र्या-मांजरासारखे भांडतात, अशी टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली. जयपूरमध्ये ते म्हणाले, पीएमपदाचा उमेदवार जाहीर करण्यास सांगा. त्यांनी नरेंद्र मोदींना पुढे केल्यास काँग्रेसला प्रचाराची गरज नाही. विजय आमचाच.