आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली/ नांदेड - भडक आणि द्वेषपूर्ण भाषण करून विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्याविरुद्ध भोकर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्राने याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते. दरम्यान, तोगडियांवर गुन्हा दाखल झाल्याचा निषेध म्हणून भाजप-शिवसेना व विहिंपतर्फे आज भोकर बंदचे आव्हान केले आहे.
गेल्या 22 जानेवारीला भोकर येथे आयोजित हिंदू हितचिंतक संमेलनात तोगडिया यांचे भाषण झाले होते. हे भाषण प्रक्षोभक आणि विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारे असल्याची तक्रार ठाण्यात दाखल झाली होती. हे प्रकरण फारसे गांभीर्याने न घेता राज्य सरकारने काहीही कारवाई केली नाही. मात्र, केंद्र सरकारने याची दखल घेऊन राज्य सरकारला तातडीने पावले उचलण्यास सांगितले.
केंद्र सरकारच्या या निर्देशांनंतर राज्य सरकारने केंद्राला हमी देत या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कळवले होते. यादरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनीही गुरुवारी तोगडियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गेल्या 1 फेब्रुवारीला आंध्रात बोलतानाही तोगडिया यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते.
ओवेसी लक्ष्य!- तोगडिया यांनी आपल्या भाषणात एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य करून तुफान शाब्दिक फटकेबाजी केली होती. ओवेसी यांनी आदिलाबाद जिल्ह्यात निर्मल येथे असेच वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते.
एक तासाच्या भाषणात एमआयएम नेत्यांना इशारे- तोगडिया यांच्या भोकरमधील सुमारे एक तासाचे भाषण अत्यंत आक्रमक आणि त्वेषपूर्ण होते. विशिष्ट समाजाला लक्ष्य करून केलेल्या या भाषणात त्यांनी एमआयएम नेत्यांनाही इशारे दिले होते. त्यासंबंधीची तक्रार ठाण्यात दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे भोकर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडित मुंडे यांनी सांगितले. तोगडियांविरुद्ध कलम 153 (अ), 295 (अ), 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे मुंडे म्हणाले.
कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता - विश्व हिंदू परिषदेस 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हिंदू हितचिंतक संमेलन घेण्यात आले. संमेलन फक्त हिंदूंसाठीच होते. प्रवीणभाई हिंदू हितासाठीच बोलले. यात कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.’- साईनाथ रेड्डी, किनवट जिल्हा सहमंत्री, विहिंप
ना धमकी दिली, ना कुणाचे नाव घेतले...- ओवेसी यांनी पंधरा मिनिटे पोलिसांना हटवून पाहा, काय होते ते? असा इशारा दिला होता. यावर तोगउिया यांनी प्रत्युत्तर देत अनेक भडक विधाने केल्याचा आरोप आहे. गेल्या वीस वर्षांत ज्या ज्या वेळी पोलिसांनी अंग काढून घेतले त्या-त्या वेळी काय घडले ते पाहा, असे तोगडियांनी म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावर प्रतिक्रिया देताना तोगडिया यांनी आपण कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा जातीचे नाव घेतले नाही व हिंसाचाराची धमकी दिली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या भाषणाच्या न्यायवैद्यक चाचणीनंतर पुरावा सबळ ठरला तर त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
ओवेसींना अटक, मग तोगडियांना का नाही?- चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल ओवेसींना अटक होऊ शकते, तर तोगडियांना का नाही? गुन्हा दाखल करण्याची विनंती गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली. त्यांनीही या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.’ - नसीम खान, अल्पसंख्याकविषयक मंत्री
दिग्गीराजाही सरसावले - तोगडियांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे. देशातील एकात्मतेशी खेळण्याचा कोणत्याही नेत्यांना अधिकार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, माकपचे नेते सीताराम येचुरी यांनीही तोगडियांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.