आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाठक बंटी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - देशभरात 500 पेक्षा जास्त चो-यांचा इतिहास त्याच्या नावे आहे. त्यासाठी मुंबईसह विविध राज्यांचे पोलिस त्याचा शोध घेत होते. एखाद्या चित्रपटातील कथेलाही लाजवेल असा महाठक बंटी ऊर्फ देवेंद्र पाल याला भोपाळ पोलिसांनी अलगद ताब्यात घेतले आहे.
चोरी करून पोलिसाला गुंगारा देण्याच्या बाबतीत बंटीचा हात धरणारा दुसरा चोर देशात नसावा. 500 पेक्षा जास्त चो-यांप्रकरणी विविध शहरांमधील पोलिस त्याचा शोध घेत होते, परंतु प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. आपण नेपाळी असल्याचे भासवत भोपाळ पोलिसांनाही गुंगारा देण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. बंटी येथील एका लॉजवर थांबल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिली.
‘बिग बॉस’ कार्यक्रमात सहभागी होऊन गायब झालेला बंटी येथे येथील गंगा पॅलेस या हॉटेलमध्ये उतरला आहे, असे नागरिकांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले व त्यांनी परिसराची नाकेबंदी करून बंटीला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून चांदीचे चमचे व अनेक मूर्ती आढळून आले. या वस्तू त्याने आठवडाभरापूर्वी दिल्लीच्या एका पॉश कॉलनीतून चोरल्या होत्या. हा बंटीच आहे याची खातरजमा करून घेण्यासाठी पोलिस त्याच्या बोटाचे ठसे पडताळून पाहत आहेत. त्याचा अहवाल आल्यावर बंटीवर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे भोपाळच्या कोतवाली ठाण्याचे प्रभारी आर. पी. अग्रवाल यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांना दे धक्का : 1994 मध्ये मुंबई पोलिसांनी बंटीला ताब्यात घेतले होते. अटक करून पोलिस त्याला ठाण्याकडे नेत असताना गाडीत मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून पोलिसांना त्याने गाडीला धक्का द्यायला लावत तो पोलिसांची गाडी घेऊन फरार झाला.
वेडा, नेपाळी भासवून पळण्याचा प्रयत्न: या आधी अनेक ठिकाणच्या पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेल्या बंटीने भोपाळ पोलिसांनाही चकमा देण्याचा प्रयत्न केला. मी मानसिकदृष्ट्या विकृत (वेडा) आहे. मी भारतीय नसून नेपाळी आहे, अशी कारणे त्याने पोलिसांना सांगितली. मीडियालाही तो असेच सांगत होता.
माझे नाव नेपोलियन - माझे नाव बंटी ऊर्फ देवेंद्र पाल नाही... मी तर नेपोलियन आहे... नाही नाही मी जीझस आहे.. अपहरण करून पोलिसांनी मला येथे आणले आहे. भोपाळच्या कोतवाली पोलिस ठाण्यात बंटी मीडियाला सांगत होता. अर्थात त्यावर कुणी विश्वास ठेवला नाही. कारण नेटवर दिसणा-या छायाचित्रांमधील बंटी आणि इसम एकच होता.
* दिल्ली, चेन्नई, चंदीगड पोलिसांनी याआधी पकडले होते, परंतु त्यांना गुंगारा देऊन बंटी फरार
*'ओय लक्की लक्की ओय’ हा चित्रपट बंटीच्याच जीवनावर आधारित आहे, असे म्हटले जाते. ‘बिग बॉस - 4’ मध्येही बंटी दोन-चार दिवसांसाठी सहभागी झाला होता.
*‘ओय लक्की’, ‘बिग बॉस’मुळे चर्चेत
*देशभरात 500 पेक्षा अधिक चो-या बंटीच्या नावे
*महागड्या लक्झरी गाड्या व घड्याळे लुटण्याचा शौक