Home »National »Delhi» Delhi Braveheart's Friend, Police In War Of Words; Court Summons 5 Accused

गँगरेप प्रकरणी दिल्ली पोलिस गोत्यात

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 03:29 AM IST

  • गँगरेप प्रकरणी दिल्ली पोलिस गोत्यात

नवी दिल्ली/बलिया- दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पीडित मुलीच्या मित्राने क्रौर्याची कहानी कथन केल्यानंतर दिल्ली पोलिसांत अस्वस्थता पसरली आहे. शनिवारचा दिवस पोलिसांनी यावर स्पष्टीकरण देण्यात घालवला. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही गांभीर्याने दखल घेत तपासानंतर काही ठोस सांगता येऊ शकेल, असे म्हटले आहे. दरम्यान, वेळेवर मदत मिळाली असती बहिणीचे प्राण वाचले असते, असे मुलीच्या भावाने म्हटले आहे.


दिल्ली पोलिस सहआयुक्त विवेक गोगिया यांनी पीडित मुलीच्या मित्राने केलेले घटनेचे वर्णन असत्य असल्याचे म्हटले आहे. माहिती मिळताच पीसीआर व्हॅन घटनास्थळी दाखल झाली होती तसेच पीडित मुलगी आणि तिच्या मित्राला अर्ध्या तासाच्या आत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, भाजपसह अनेक राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी पोलिस आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर टीका केली आहे.


भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पोलिस आणि रुग्णालयातील संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. एका न्यूज चॅनलविरुद्ध गुन्हा दाखल केल्याबद्दल त्यांनी निषेध केला.


आरोपींना उद्या हजर करणार
पाचही आरोपींना कोर्टाने शनिवारी समन्स जारी केले. सोमवारी या सर्वांना हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. साकेत महानगर दंडाधिकारी नम्रता अग्रवाल यांनी 3 जानेवारीला दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत हे समन्स जारी केले. आरोपपत्रात सर्वच आरोपींविरुद्ध हत्या आणि बलात्कारासह 9 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


आंतरराष्‍ट्रीय संस्थेकडून निषेध
वॉशिंग्टन : एका न्यूज चॅनलविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाचा अमेरिकेतील पत्रकारांच्या ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट’ या संघटनेने निषेध केला आहे. मीडियाने या घटनेतील सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे संघटनेचे समन्वयक बॉब डाईस यांनी म्हटले आहे. कारवाई मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.

पीडित मुलीचे नाव जाहीर करण्याची मागणी
स्वामी ओमजी नामक एका व्यक्तीने पीडित मुलीचे नाव आणि 16 डिसेंबरचा घटनाक्रम जाहीर करण्याची मागणी दिल्ली कोर्टात केली आहे. बलात्कार पीडितांना मदत करणाºया संस्थेचा संस्थापक असल्याचे सांगणाºया ओमजी यांनी महानगर दंडाधिकारी नम्रता अग्रवाल यांच्या कोर्टासमोर नमूद केले आहे की, ‘मी भारताचा नागरिक आहे. जिच्यावर अत्याचार झाला ती या देशाची मुलगी आहे. तिचा मित्रही एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून समोर आला आहे. अशा परिस्थितीत आता लवण्यासारखे काही नाही.’ यावर सरकारी वकील राजीव मोहन यांनी विरोध दर्शवला. संबंधित टीव्ही चॅनलवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.

चार आरोपांवर पोलिसांचे स्पष्टीकरण

पहिला आरोप-पोलिसांनी पीडित मुलीला रुग्णालयात हलवण्यात विलंब केला. ठाण्याच्या हद्दीचा घोळ ते घालत बसले.

स्पष्टीकरण- पीसीआर व्हॅनला ठाण्याच्या हद्दीशी देणेघेणे नसते. 10.21 वाजता पोलिसांना पहिला फोन आला आणि 10.55 वाजता मुलगी व मित्र दोघांनाही सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वस्त्र फाटलेली असल्यामुळे अंग झाकण्यासाठी तसेच थंडीपासून बचावासाठी शक्य होईल ते देण्यात आले होते.

दुसरा आरोप- मुलीला खासगी सोडून सफदरजंग रुग्णालयात का नेण्यात आले?

स्पष्टीकरण- सफदरजंग नामांकित मल्टी स्पेशालिटी रुग्णालय असल्यामुळे पीडित मुलगी व तिचा मित्र या दोघांनाही खासगी रुग्णालयाऐवजी तेथे दाखल केले गेले.

तिसरा आरोप- मित्राला 4 दिवस ठाण्यात का ठेवण्यात आले?

स्पष्टीकरण- सफदरजंग रुग्णालयात प्रथमोपचारांनंतर त्याला सोडण्यात आले होते. तपासात मदत आणि जबाबासाठीच त्याला ठाण्यात बोलावण्यात आले होते.

चौथा आरोप-पोलिसांनी कारवाई करताना पाठ थोपटून घेण्याचाच प्रयत्न केला.

स्पष्टीकरण- तपासात काय प्रगती झाली आहे याची माहिती पीडित मुलीशी संबंधित सर्वांना नियमित देण्यात आली. हेच पोलिसांचे धोरण आहे.

आरोपपत्राच्या कव्हरवर ‘302’ विसरले

दिल्ली पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्राच्या कव्हरवर आरोपींविरुद्ध हत्येचे 302 कलमच लावलेले नाही. शनिवारी सुनावणीदरम्यान न्या. नम्रता अग्रवाल यांनीच हा हलगर्जीपणा दाखवून दिला. यावर पोलिसांनी ही टायपिंगमधील चूक असल्याचे सांगितले. ही चूक आरोपपत्राच्या केवळ कव्हरवरच झाली आहे. यात दुरुस्ती करण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली असल्याचे दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते राजीव मोहन यांनी सांगितले.
मात्र, न्यायाधीशांनी याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

Next Article

Recommended