आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Gang Rape Issue India President Action On Hanging For Rapist

राष्ट्रपतींनी ‘त्या’ दया अर्जांवर विचार करू नये; स्थायीची शिफारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बलात्कार प्रकरणांत दोषी ठरलेल्यांच्या दया अर्जावर राष्ट्रपतींनी विचार करू नये, अशी शिफारस गृह विभागाच्या संसदीय स्थायी समितीने सरकारकडे केली आहे. हा अहवाल शुक्रवारी राज्यसभेत सादर करण्यात आला.
अशा दया अर्जांचा निपटारा तीन महिन्यांच्या आत व्हावा, एखाद्याचा अर्ज मंजूर केलाच तर त्याचे कारण जाहीर करावे आणि लैंगिक शोषणातील दोषींची नावे जाहीर करण्यात यावीत अशा शिफारशीही अहवालात करण्यात आल्या आहेत. एखाद्या अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाला किंवा ती गंभीर जखमी असेल तर दोषींना मृत्युदंड द्यावा, असेही अहवालात नमूद आहे. समितीचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी सांगितले, अल्पवयीन ठरवणारी वयाची मर्यादा बदलण्याबाबत समितीने अहवालात विचार केलेला नाही.

प्रमुख शिफारशी
> न्यायप्रक्रिया वेगवान असावी. फास्ट ट्रॅक कोर्टांसाठी निधी वाढवावा. अ‍ॅसिड हल्ल्याला गंभीर गुन्हा मानण्यात यावे.
> पत्नीशी बळजबरी करण्याच्या प्रकारांना गुन्हेगारीच्या कक्षेत आणले जाऊ नये. यामुळे कुटुंबांची वाताहत होईल.
दिल्लीत पुन्हा अत्याचार
दुसरीत शिकणार्‍या एका बालिकेवर शाळेच्या आवारातच बलात्कार झाल्याने दिल्लीत पुन्हा एकदा हा मुद्दा तापला. घटना गुरुवारची असली तरी मुलीच्या पित्याने शुक्रवारी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, शुक्रवारी काही संतप्त लोकांनी दगडफेक केली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पीडित मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. मंगोलपुरी भागात महापालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला. दरम्यान, पीडित मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा दुपारी राजधानीत पसरल्याने एकच खळबळ माजली. संतप्त लोक रस्त्यावर आले.

दिल्ली परिवहन मंडळाच्या तीन बसवर तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. यात काही लोक जखमी झाले आहेत.
गुरुवारी मधल्या सुटीत ही मुलगी वर्गात एकटीच डबा खात होती. एवढ्यात मागून आलेल्या व्यक्तीने तिचे तोंड दाबून दुसर्‍या खोलीत नेले व अत्याचार केला. वर या नराधमाने तिला धमकीही दिली. मुलीनेही घरी काही सांगितले नाही. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी खरा प्रकार सांगितल्यानंतर रात्री स्वत: मुलीनेही घडला प्रकार सांगितला.