Home »National »Delhi» Delhi Gang Rape Victim Came In Front Of Media

रक्ताच्‍या थारोळ्यात पडली होती 'दामिनी', कोणी कपडेही तिला दिले नाही

दिव्‍य मराठी नेटवर्क | Jan 05, 2013, 10:40 AM IST

  • रक्ताच्‍या थारोळ्यात पडली होती 'दामिनी', कोणी कपडेही तिला दिले नाही

नवी दिल्ली : चालत्या बसमध्ये झालेल्या अत्याचारातील पीडित मुलीचा मित्र शुक्रवारी प्रथमच समोर आला. ‘झी न्यूज’वर त्याने या क्रौर्याचा खुलासा करताना 16 डिसेंबरला रात्री नेमके काय घडले ते कथन केले. एवढेच नव्हे, पोलिस आणि रुग्णालयाची भूमिका तर फारच क्लेशदायक होती. त्याने सांगितले, ‘आम्ही रक्तबंबाळ, वस्त्रांविना रस्त्यांवर पडलो होतो. 15-20 लोक जमले. कुणीही मदत केली नाही. नंतरची घटना त्याच्याच शब्दांत... (बसमधील अत्याचाराचे वर्णन येथे करणे शक्य नाही.)

बसमधील सहा जणांनी आम्हाला बेदम मारहाण केली. बसच्या काचांवर काळी फिल्म व पडदे होते. लाइट बंद होते. आम्ही एकमेकांना वाचवण्याचे प्रयत्न करत होतो. आरडाओरडही केली. माझ्या मैत्रिणीने पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या गुंडांनी तिचा मोबाइल हिसकावून घेतला. माझ्या डोक्यावर रॉड मारला. माझी शुद्ध हरपली.

शुद्धीवर आलो तर ते बस कोठेही पळवत होते. दोन-अडीच तास हा प्रकार सुरू होता. त्यानंतर आम्हा दोघांना त्यांनी महिपालपूर उड्डाणपुलाखाली फेकले. ते माझ्या मैत्रिणीला फेकून देत होते. मात्र, मी तिला बसच्या बाहेर ओढले. आमच्या अंगावर कपडे नव्हते. अंगातून रक्त वाहत होते. मदतीची प्रतीक्षा केली. अनेक गाड्या आमच्याजवळून गेल्या. मी हात दाखवून त्या थांबवण्याचा प्रयत्न केला... रिक्षा, कारचालक वेग कमी करायचे. मात्र, थांबले कोणीच नाही. कपडे द्या, असे मी ओरडत होतो. मात्र, कोणीच कपडे दिले नाहीत. मदतीसाठी 20 ते 25 मिनिटे आम्ही याचना करत होतो. 15 ते 20 जण तेथे उभे होते. कोणी म्हणायचे, ही लुटीची घटना आहे. दीड ते दोन तास आम्ही तेथेच पडलेले होतो. त्यांच्या मनात असते तर पीसीआर, अ‍ॅम्ब्युलन्सची वाट पाहण्यापेक्षा आम्हाला रुग्णालयात घेऊन जाऊ शकले असते. त्यानंतर कोणीतरी फोन केला. तीन पीसीआर वाहने आली. मात्र, ही घटना कोणत्या ठाण्याच्या हद्दीत येते यावरून पोलिसांची आपसांत चर्चा सुरू होती. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिपालपूर येथील नजीकच्या रुग्णालयात नेले नाही. त्यात अडीच तास गेले. हॉस्पिटलमध्येही कोणी मदत केली नाही. साधी चादरही दिली नाही. सफाई करणा-याकडे मदत मागितली. थंडी वाजतेय, पडदा देण्यास सांगितले. मात्र कोणीही मदत केली नाही.

माझ्या हाता-पायातून रक्त वाहत होते. मी हातही उचलू शकत नव्हतो. पाय फ्रॅक्चर झाला होता. मात्र, घटनेच्या रात्रीपासून पुढे तीन ते चार दिवस पोलिस ठाण्यातच होतो. खरे काय घडले हे सांगून नये, असे सुरुवातीला मनात आले होते. अपघात झाल्याचे मी सर्वांना सांगितले. घटनेच्या रात्रीच मी पोलिस ठाण्यात आलो होतो. तेथून मी मित्रांना फोन करून अपघात झाल्याची माहिती दिली. आता हे प्रकरण खूपच वाढले होते. त्यामुळेच तक्रार दाखल झाली. विशेष न्यायदंडाधिका-यांसमोर जबाब दिला. मी रुग्णालयात पोहोचलो. ती व्हेंटिलेटरवर होती. ऑक्सिजन मास्क लावला होता. बोलताना मास्क सरकवावा लागायचा. तरीही त्यांनी जबाब नोंदवून घेतला. तीन-चार पानी जबाबावर सह्या घेतल्या. त्यावेळी अनेक बाबी समोर आल्या, ज्या मला माहीत नव्हत्या. एवढे क्रौर्य जनावरही करू शकत नाही. प्राणीही सावजाला गळा दाबून मारतात. येथे तर जिवंत माणसावर असा अत्याचार झाला होता. नंतर कळले की, पोलिसांनी दबाव टाकल्याचे भाष्य एसडीएमनी केले. मात्र, तो सत्य जबाब होता. माझ्या मैत्रिणीचे सर्व प्रयत्न फोल ठरले. औषधांची वेळ झाली असे सुचवणा-या डॉक्टरांकडे दुर्लक्ष करत तिने तो जबाब दिला होता. माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती. मी झोपू शकत नव्हतो. ज्यांच्याबरोबर आपण राहतो, त्या मित्रांचे चित्र सतत डोळ्यापुढे येतेच की. मी स्वत:ला दोष देत होतो. आपण गेलोच का ? त्याच बसमध्ये का बसलो? हे का केले नाही? दोन आठवडे मी बोलूही शकत नव्हतो. कोणी काही विचारले तरी चिडचिड व्हायची.

लोक विचारतात की, तुम्ही जीव वाचवण्याबाबत विचार केला होता का? उत्तर दिले, नाही. असा विचार तर पशूदेखील करणार नाहीत. तुमचा मित्र संकटात असताना त्याला सोडून पळून जाण्याबाबत विचारही केला जाऊ शकत नाही. तसे केले असते तर मी आज वेडा झालो असतो. जगूदेखील शकलो नसतो. शुद्धीवर असेपर्यंत प्रयत्न केले. कमीत कमी मला त्या गोष्टीचा खेद वाटत नाही की मी प्रयत्नच केले नाहीत. परंतु असे वाटते की, तिला वाचवता आले असते तर बरे झाले असते.

माझ्याशी सरकारच्या वतीने कुणीच संपर्क साधला नाही. तुम्ही लोकांशी संपर्क साधू नका, त्यांच्याशी बोलू नका, असा सल्ला दिला जात होता. तुम्ही काही बोलाल तर केस बिघडू शकते. जर माझ्या मैत्रिणीला सुरुवातीपासूनच चांगल्या रुग्णालयात उपचार मिळाले असते तर कदाचित ती जिवंत असली असती. मला वाटते, दबावाखाली काही निर्णय झाले. निदर्शने लक्षात घेऊन तिला सिंगापूरला पाठवले असावे.

रुग्णालयात मी माझ्या मैत्रिणीला सतत भेटत होतो. केस सुरू असल्याबद्दल ती समाधानी होती. माझ्यावर तिला पूर्ण विश्वास होता. मी कसा आहे, असे ती विचारायची. मी सांगितले की, सर्वांना पकडले आहे. तू बरी हो. आपण असेच लढत राहू. तिला उपचाराच्या खर्चाची चिंता होती. मी म्हटले, त्याची चिंता तू नको करू. सर्व काही ठीक होईल. माझ्या मैत्रिणीने म्हटले होते की दोषींना फाशी नको, त्यांना जिवंत जाळले पाहिजे.

दिल्ली पोलिस‘झी न्यूज’वर खटला दाखल करणार, पीडिताची ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप
नवी दिल्ली- पीडित मुलीच्या मित्राची मुलाखत प्रसारित केल्याबद्दल‘झी न्यूज’च्या विरोधात एफआरआय दाखल करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. पोलिसांचे प्रवक्ते राजन भगत यांनी सांगितले की, चॅनलने पीडिताची ओळख सार्वजनिक केली आहे. अत्याचारासह अन्य काही प्रकरणांत असे करण्यास कायदेशीर मनाई आहे. त्यामुळे चॅनलच्या विरोधात आयपीसीच्या कलम 228 (ए)नुसार खटला दाखल करण्यात येईल.

Next Article

Recommended