आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात‍ दूध भेसळीला ‘ऊत’; जन सर्वेक्षणातील निष्कर्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: तुमच्या हातात असलेल्या ग्लासातील दूध पौष्टिक आहे, असा विचार तुम्ही करत असाल तर त्यावर पुन्हा एकदा नक्कीच विचार करा. कारण देशात पहिल्यांदाच करण्यात आलेल्या जन सर्वेक्षणातील निष्कर्ष धक्कादायक असे आहेत. महाराष्ट्रातील 65 टक्के नमुन्यात गुणवत्तेचा अभाव दिसून आला.
देशातील दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी ही पाहणी करण्यात आली होती. ग्राहकांना पुरवठा करण्यात आलेले दूध किती पौष्टिक आहे याची तपासणी करण्यासाठी देशभरातून दुधाचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यातील 69 टक्के नमुने हे गुणवत्तेचा निकषावर उतरले नाहीत. शुद्धतेच्या कसोटीवर ते अयशस्वी ठरले.
धक्कादायक म्हणजे 14 टक्के दूध नमुन्यात डिटर्जंटचे प्रमाण आढळून आले. हे नमुने बिहार, झारखंड, ओडिशा, प. बंगाल येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ आढळून आली आहे. देशातील सात राज्यांतील दूध हे भेसळयुक्त होते. एकही नमुना हा भेसळमुक्त आढळून आला नाही.
दुधात सोडियम क्लोराइडचा वापर केल्याचे आसाम, नागालँडमधील नमुन्याच्या तपासणीतून उजेडात आले आहे. त्यामुळे हे दूध पौष्टिक नाही हे स्पष्टच आहे. गोवा, पुद्दुचेरी येथील दूध नमुने मात्र या भेसळीला अपवाद ठरले आहेत. दोन्ही ठिकाणी असलेल्या दुधाची गुणवत्ता चांगली दिसून आली.
देशातील 33 राज्यांतून एकूण 1 हजार 791 नमुने मागवण्यात आले. यात केंद्र शासित प्रदेशांचादेखील समावेश आहे. यातील 1 हजार 226 नमुने गुणवत्तेवर उतरू शकले नाहीत. महाराष्ट्रातील 65 टक्के, अरुणाचल प्रदेशातील 68 टक्के, हिमाचलमधील 59 टक्के नमुने गुणवत्तेवर तग धरू शकले नाहीत. या नमुन्यांत भेसळ आढळून आली आहे. पंजाबमध्ये 81 टक्के गुणवत्ता घसरली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 83 टक्के नमुने भेसळयुक्त होते. केरळ-28, कर्नाटक-22, तामिळनाडू 12 , आंध्र प्रदेश 6.7 असे प्रमाण आढळून आले.
देशभरातील दूध नमुन्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा सर्वत्र एक गोष्ट समान दिसून आली. दुधात पाण्याचे प्रमाण सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात होते. पाण्यामुळे दुधातील पौष्टिक घटक कमी होतात. अनेकदा पाण्यामुळे आरोग्यदेखील धोक्यात येऊ शकते.