आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंडा पद्धतीमुळे बिहारमध्ये लग्नासाठी वराचे अपहरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- सैन्यभरतीचा निकाल आला आणि उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यापूर्वीच काही लोकांनी त्याचे बंदुकीच्या बळावर अपहरण केले. अपहरणकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या तरुणाचे बळजबरी एका तरुणीशी लग्न लावून दिले.


ही कहाणी आहे बिहारच्या अंकुश चौधरीची. बिहारमध्ये खगडिया येथे राहणारा अंकुश वर्षभरापूर्वी लष्कराची परीक्षा उत्तीर्ण झाला. एक दिवस अंकुश काही मित्रांसह बाजारात जात असताना काही लोकांनी त्याचे अपहरण करून गोपालपुरा गावात घेऊन गेले. तेथे विवाहाची जय्यत तयारी होती. नवरी मुलगीही बोहल्यावर हजर होती. कधीही न पाहिलेल्या त्या तरुणीशी अंकुशचे लग्न झाले.


इंदूर येथे सीमा सुरक्षा बलाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नुकत्याच पार पडलेल्या पासिंग आऊट परेडमध्ये अंकुशने सुवर्णपदक स्वीकारले. अंकुशचे वडील अर्जुन चौधरी यांनी सांगितले की, बिहारमध्ये दारिद्र्यात असलेल्या अनेक कुटुंबांना मुलींच्या विवाहासाठी दुसरा पर्याय नसतो. हुंडा देणे शक्य नसल्याने उपवर मुलीचे पालक चांगला मुलगा हेरुन त्याचे अपहरण करतात आणि बंदुकीच्या धाकावर आपल्या मुलीशी लग्न लावून देतात. एकदा लग्न झाले की कोणीही त्यावर आक्षेप घेत नसल्याचे अर्जुन चौधरी यांनी सांगितले. अंकुशनेही सुवर्णपदकासह पत्नीला घेण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले.