आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E Learning: 20 Thousand College Connect To VC In India

ई-लर्निंग:20 हजार कॉलेज व्ही.सी.ने जोडणार, ‘अ-व्ह्यू’ सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महाविद्यालयात दर्जेदार लेक्चर होत नसल्याची तक्रार लवकरच दूर होणार आहे. विद्यापीठात अध्यापन करणार्‍या प्रसिद्ध प्रोफेसर मंडळींची व्याख्याने थेट ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. ही किमया व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर प्रणालीमुळे शक्य होणार आहे. देशभरातील सुमारे 20 हजार महाविद्यालये या सॉफ्टवेअरने जोडली जाणार आहेत.
उच्च शिक्षण सचिव अशोक ठाकूर आणि देशभरातील 60 कुलगुरूंच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याअगोदर केंद्राकडून त्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. ‘अ-व्ह्यू’ असे सॉफ्टवेअरचे नाव आहे. अ-व्ह्यू सॉफ्टवेअरमधील प्रोग्राम ईशान्येसारख्या भागातील महाविद्यालयांना खूपच उपयोगी आहे. दुर्गम भागातील सुमारे 100 महाविद्यालये आमच्याशी जोडलेली आहेत. त्यांना या ऑनलाइन व्यवस्थेमुळे निश्चितपणे फायदा होईल, असे शिलाँग येथील ईशान्य विद्यापीठाचे उपकुलगुरू बेकिंग्टन मिरबोह यांनी सांगितले. आम्ही हा प्रोग्राम चालवतो. ‘एन्लायटन युवरसेल्फ एव्हरी सॅटर्डे ’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. ए-व्ह्यूच्या माध्यमातून आम्ही दर शनिवारी हा ऑनलाइन कार्यक्रम विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रसारित करतो, असे मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक राजपाल हांडे यांनी सांगितले.

अमृता विद्यापीठाची निर्मिती
कोल्लम येथील अमृता विद्यापीठाने कॉन्फरन्सिंगचे हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. राष्ट्रीय शिक्षण अभियानांतर्गत त्याची निर्मिती झाली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचाही त्यात सहभाग होता.

मुंबई विद्यापीठात
देशातील सुमारे 450 विद्यापीठे ऑनलाइन व्याख्यानाची व्यवस्था असलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करतात. त्यात मुंबई विद्यापीठ, एनआयटीटीआर कोलकाता, पुदुचेरी विद्यापीठ, आयआयटी हैदराबादमध्ये ही यंत्रणा असल्यामुळे 2 हजार महाविद्यालये त्याद्वारे जोडली गेली आहेत.

कोणासाठी असेल वरदान?
ई-लर्निंगचे हे व्यासपीठ असून या माध्यमातून प्रशिक्षक, प्राध्यापक तसेच दूरशिक्षण कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर दुर्गम भागातील महाविद्यालयांनाही त्याचा उपयोग होईल. दर्जेदार अध्यापकांचे आव्हान असणार्‍या ठिकाणी हे सॉफ्टवेअर जणू वरदानच ठरणार आहे.