नवी दिल्ली- पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणूकीनंतर काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असा विश्वास सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी व्यक्त केला आहे. तसेच नरेंद्र मोदी हे जर पंतप्रधान झालेच तर एक गुजराती म्हणून मला आनंदच होईल, असेही पटेल यांनी सांगितले.
मूळचे गुजरातचे असलेले ६३ वर्षीय अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे जवळचे व निकटवर्तीय आहेत. पटेल हे काँग्रेसमधील सर्वांत पॉवरफूल नेते म्हणून परिचित आहेत. गेली ६ टर्म ते राज्यसभेत काँग्रेसकडून निवडून जात आहेत. काँग्रेसमधील नेत्यांचे ते भविष्य ठरवित असले तरी पटेल हे मितभाषी म्हणून ओळखले जातात. तसेच ते माध्यमांपासून चार हात दूर राहणे पसंत करतात. असे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या अहमद पटेल यांनी नुकतीच rediff.com ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत पटेल यांनी आपण लवकरच राजकारणात निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले.
पटेल म्हणाले, मी आता ६३ वर्षांचा झालो आहो. फार फार तर मी अजून २-३ वर्षे येथे काम करेल. मला राजकीय इच्छाशक्ती नाही तसेच त्यासाठी मी राजकीयदृष्ट्या योग्यही नाही. मात्र, २०१४ साली होणा-या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर नक्की येईल. तसेच देशाचे पंतप्रधान राहुल गांधी बनतील असा विश्वास मला आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनतील का? यावर पटेल म्हणाले, नरेंद्र मोदी कधीही पंतप्रधान बनणार नाहीत. कारण ते फक्त गुजरातचा विचार करतात. तुम्हाला देश पातळीवर नेतृत्त्व करायचे असेल तुम्ही देशाचा विचार करायला हवा. मोदींमध्ये देशाला एकरुप करण्याची क्षमता नाही. त्यांच्या पक्षातच त्यांना मोठा विरोध आहे.
मोदी देशभर लोकप्रिय होत असून, ते पुढील पंतप्रधान बनतील असे बोलले जात आहे यावर पटेल म्हणाले, नरेंद्र मोदी मूळातच लोकप्रिय नाहीत. मोदी हे उत्तम व्यवस्थापक आहेत. ते उत्तम व्यवस्थापक असल्याने त्यांना स्वत:चे चांगले मार्केटिंग करता येते व त्यात ते यशस्वी ठरले आहेत. मोदी जर पंतप्रधान झालेच तर एक गुजराती म्हणून मला आनंद होईल, असेही ते म्हणाले. तुमची मोदी यांच्याशी मैत्री असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होते, यावर पटेल म्हणाले, आमची कसलीही मैत्री नाही. मी मोदींना सणां-सुदाला शुभेच्छा देतो. आता ते ही बंद झाले आहे. मी त्यांना २००९ साली शेवटचे भेटलो होतो ते ही विमानतळावर आणि सोनिया गांधी यांच्यासमवेत. त्यावेळीही फक्त आमच्यात हाय-हॅलो व नमस्कारच झाला होता, असे सांगत मोदी आणि आपल्यात दोस्ती नसल्याचे स्पष्ट करतात. मात्र, राजकीय नेते अशा चर्चा करीत राहतात व आमच्या पक्षातील काही नेतेही अशा चर्चा करतात त्याचे वाईट वाटते, असेही मत व्यक्त केले.
स्त्रोत- rediff.com