आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरोजशाह कोटलास गतवैभव प्राप्त होणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: चौदाव्या शतकातील दिल्लीचा सुलतान फिरोजशाह तुघलकाने यमुना नदीकाठी बांधलेल्या किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (एएसआय) सहकार्याने सुरू करण्यात आले असून, फिरोजशाह कोटला नावाने ओळखल्या जाणा-या या किल्ल्यास लवकरच गतवैभव प्राप्त होणार आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा हा किल्ला गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित असल्यामुळे तो समाजकंटकांचा अड्डा झाला आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळही कमी झाली आहे. किल्ल्याचा जो भाग सध्या ब-या अवस्थेत आहे त्याची दुरुस्ती प्रथम केली जाणार आहे.
आतापर्यंत यमुनेच्या बाजूला असलेल्या भिंती व खोल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे आणि लवकरच येथील प्राचीन बारवेच्या जीर्णोद्धाराचेही काम पूर्ण होणार आहे. एएसआयने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात या भागास पुन्हा एकदा पूर्वीचेच रंगरूप प्राप्त होणार आहे. त्यानंतर किल्ल्याच्या इतर भागांचीही दुरुस्ती वेगाने करण्यात येईल. जीर्णोद्धाराचे बरेच काम बाकी आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की, अनेक इमारती ढासळलेल्या आहेत. पर्यटकांसाठी ब-यापैकी रस्ताही अस्तित्वात नाही आणि प्रकाशाचीही व्यवस्था नाही. एएसआयच्या सूत्रांनी सांगितले की, इमारतींच्या रिनोव्हेशनचे काम सुरू असून, प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी दिल्लीच्या पर्यटन विभागाशी बोलणे झाले आहे. येथील बारवेचे काम पुढील महिन्यात पूर्ण झाल्यानंतर परिसरातील अशोक स्तंभ, जामी मस्जिद, खास महाल, जनाना महाल, अंगुरी महाल, महल-ए-बार-ए-आम या भागांच्याही सौंदर्यीकरणाचे काम एएसआय हाती घेणार आहे. यासाठी दोन वर्षे लागतील, असा अंदाज आहे.
किल्ल्याचे महत्त्व
यमुनेच्या काठावर फिरोजशाह तुघलकाने 1354 मध्ये फिरोजशाह कोटलाची उभारणी केली होती. त्याने आपल्या 38 वर्षांच्या शासनकाळात दिल्ली परिसरात 1200 उद्योगधंदे सुरू केले. हा किल्ला बहुभुजाकार आहे. तो अर्धा मैल लांब आणि पाव मैल रुंद आहे. यात खास महाल, जनाना महाल, महल-ए-बार-ए-आम, अंगुरी महाल, शाही महाल, जामा मस्जिद आणि बिनपायºयांची बारव आजही पर्यटकांना आकर्षित करते.