आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्‍यासाठी संघावर दबाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ, नवी दिल्ली - गुजरातचे फायरब्रँड मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी घोषित करण्यासाठी संघ परिवारातील संघटनांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर दबाव वाढत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी मोदींच्या नावास जाहिर पाठिंबा दिल्यानंतर रविवारी भाजपचे नवे अध्यक्ष राजनाथसिंह यांनीही मोंदीचे गुणगान गायले. एक सक्षम आणि लोकप्रिय नेते आहेत, अशा शब्दांत त्यांचे वर्णन करून राजनाथ यांनीही भाजपमध्ये वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत हेच दाखवून दिले.

राजनाथसिंह रविवारी भोपाळ दौ-यांवर होते. पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्या वेळी ते म्हणाले, पक्षाची संसदीय समिती पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडते, अशी भाजपची परंपरा आहे. सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव संसदीय समितीनेच ठरवले. मग ही परंपरा मोडण्यासाठी तुम्ही आग्रह का करीत आहात, असा उलट सवाल त्यांनी केला. मात्र, मोदी हे सक्षम आणि लोकप्रिय नेते आहेत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

विद्यमान परिस्थितीत नेत्याचे नाव जाहीर करणे अवघड आहे, असे सांगून भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) दोघांनाही पसंत पडेल असे नाव हवे आहे. जनता दल युनायटेडसारख्या रालोआतील घटक पक्षांनी मोदींच्या नावाला विरोध दर्शवला आहे, तर शिवसेनेने सुषमा स्वराज यांना पसंती दिली आहे.

व्यक्ती सारख्या नसतात
भाजपमध्ये नेत्यांची वानवा नाही, असे राजनाथसिंह म्हणाले. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयींसारखे सर्वमान्य दुसरे नाव भाजपकडे आहे का, याबद्दल छेडले असता जगात दोन व्यक्ती एकसारख्या असू शकत नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले.

विहिंपचा दबाव
विहिंपचे नेते अशोक सिंघल यांनी गेल्या आठवड्यात संघ आणि भाजपच्या ज्येष्ठ, वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाची घोषणा करण्यात यावी, अशी जाहीर मागणीच त्यांनी केली.
मोदींसाठी जनतेचा दबाव
मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत, अशी जनतेची मागणी आहे. अशी घटना प्रथमच घडत आहे. भाजपने त्याचा विचार करावा.
अशोक सिंघल,विहिंप नेते

मंगळवार महत्त्वाचा
येत्या 5 व 6 तारखेला अलाहाबादेतील कुंभमेळ्यात संत संमेलन होत असून या संमेलनात मोदींच्या नावावर चर्चा करण्यात येणार आहे. या संमेलनात विहिंप व इतर हिंदू संघटना सहभागी होत आहेत.