आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय राजकारणातील द्रष्टे नेते : चंद्रशेखर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची 8 जुलै रोजी पुण्यतिथी पाळण्यात आली. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख. भारतीय राजकारणाच्या इतिहासात चंद्रशेखर यांनी अमीट ठसा उमटवला. तरुण तुर्कांचे नेते म्हणून त्यांची ख्याती होती. जनता पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
चंद्रशेखर यांना जाऊन पाच वर्षे झाली. ते हयात असते तर 85 वर्षांचे असते. लोक त्यांना उत्तम संसदपटू म्हणत. खरी गोष्ट अशी की, त्यांच्यात एक धमक होती. बेगडी आयुष्य ते कधीच जगले नाहीत. राजकारणी आणि खºया अर्थाने एक मुत्सद्दी म्हणून मला त्यांची आठवण येते. देश व समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे ते दूरदृष्टीचे नेते होते. आज त्यांचा वारसा चालवणारे कुणीही नाही. कारण त्यांचे राजकीय धोरण पुढे घेऊन जाणारा कुठलाही पक्ष नाही. त्यांच्या पक्षाचे ते स्वत: शेवटचे कार्यकर्ते ठरले. पन्नासच्या दशकात आचार्य नरेंद्र देव यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाच्या राजकारणात सहभागी व्हायला सुरुवात केली. पण 1964 उजाडेपर्यंत त्यांना वाटले की, त्यांचे आणि आचार्यांचे राजकीय धोरण चालवणारा काँग्रेस हा जवाहरलाल नेहरू यांचा एकमेव पक्ष उरला आहे. बहुधा त्यामुळेच त्यांनी आपल्या पक्षातील एक मोठे नेते अशोक मेहता यांच्यासह काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. मात्र, त्यांचे आणि देशाचे दुर्दैव असे की, काँग्रेसमध्ये भांडवलवादी राजकीय धोरणाला पाठिंबा देणाºया शक्तींचा उदय झाला. काँग्रेसमधील सिंडिकेटने काँग्रेसच्या राजकारणावर पूर्णपणे कब्जा केला. इंदिरा गांधींनी सिंडिकेटविरुद्ध बंड पुकारले. मात्र, त्या पुत्रमोहात अडकल्या आणि त्यांनीही हुकूमशाही मार्गाचा अवलंब केल्याने चंद्रशेखर यांना जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील हुकूमशाहीविरोधी आंदोलनाला साथ द्यावी लागली. योगायोगाची गोष्ट म्हणजे चंद्रशेखर यांनी ज्या जातीयवादी राजकारणाला सतत विरोध केला. त्याचीच पाठराखण करणारे लोक जेपींच्या आंदोलनाचे कर्तेधर्ते होते. त्यात समाजवादी लोक समोर दिसत असले तरी गुजरातपासून बिहारपर्यंत रा. स्व. संघाकडेच सूत्रे होती हे सर्वांनाच माहीत होते. नंतर स्थापन झालेल्या सरकारवर संघाचा सहकारी पक्ष जनसंघाचा प्रभाव होता. चंद्रशेखर आणि मधू लिमये यांनी रा. स्व. संघाला एक राजकीय पक्ष असेच म्हटले आणि जनता पक्षाचे सदस्य दुसºया पक्षाचे सदस्य असू नयेत यासाठी प्रयत्नही केले. मात्र, संघाने जनता पक्ष फोडला आणि वेगळा भारतीय जनता पक्ष स्थापन केला. पण चंद्रशेखर यांनी कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही.
इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले तेव्हा चंद्रशेखर यांनी पूर्ण पाठिंबा दिला आणि पुत्रप्रेमापोटी इंदिरा गांधींनी जेव्हा हुकूमशाही आणि बेजबाबदार राजकीय परंपरा रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना इशारा देऊन चंद्रशेखर यांनी हुकूमशाही प्रवृत्तींविरुद्ध आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांच्या जीवनातील एका घटनेने मला फारच प्रभावित केले. 7 नोव्हेंबर 1990 रोजी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांचे सरकार हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकजूट केली होती. व्हीपींनी आपल्या कारकीर्दीत अनेक बेजबाबदार निर्णय घेतले होते आणि त्यांना पंतप्रधानपदावरून हटवणे अत्यंत गरजेचे असल्याचे सर्वांचेच मत होते. चंद्रशेखर यांना भाषण करण्यासाठी पाचारण केले तेव्हा सभागृहात अचानक शांतता पसरली. ते म्हणाले की, या चर्चेत भाग घेताना अतीव दु:ख होत आहे. तेव्हा सभागृहातील उपस्थितांनी या मुत्सद्दी नेत्याच्या वेदना अनुभवल्या. गॅलरीत बसलेल्यांनीही श्वास रोखून त्यांचे भाषण ऐकले. चंद्रशेखर म्हणाले, अकरा महिन्यांपूर्वी देशहितासाठी आम्ही भाजपशी समझोता केला होता. देश संकटात आहे आणि सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असा विचार तेव्हा केला होता. मात्र, अकरा महिन्यांपूर्वी देशाची जी दुर्दशा झालेली होती, त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आज झाली आहे. देशात दहशतवाद, विषमता, बेरोजगारी, महागाई, सामाजिक तणाव गोष्टी वाढल्या आहेत हे खरे आहे की नाही? ते पंतप्रधानांना म्हणाले की, देश चालवणे म्हणजे नाटक नाही. प्रत्येक राजकीय कामाच्या मुळाशी गांभीर्य असले पाहिजे.
चंद्रशेखर पुढे म्हणाले की, ‘धर्मनिरपेक्षता ही मानवी जाणिवेची पहिली कसोटी आहे. त्यांनी आडवाणींना विचारले की, बाबरीप्रकरणी सल्लागार समितीने गृहमंत्री मुफ्ती मोहंमद सईद आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यांना हटवले. कारण विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांना त्यांचे तोंड पाहण्याची इच्छा नव्हती. अशा पद्धतीने देश चालवायचा आहे का? त्या दिवशी कुणी समझोता केला? विश्व हिंदू परिषदेशी समझोता असो की बाबरीप्रकरणी एखाद्या इमामाशी तडजोड. या तडजोडीच देश रसातळाला नेतील. पंतप्रधानांना ते म्हणाले की, ‘तुमचे सरकार पडल्याने काही बिघडणार नाही, पण ज्या संस्था आपण उभ्या केल्या आहेत त्यांचा अपमान करू नका. अशा तुघलकी कारभाराचा निषेध करणे मी राष्ट्रीय कर्तव्य समजतो.’
चंद्रशेखर यांनी या भाषणात अनेक विषयांची चर्चा केली. त्यांचे विचार भारताच्या राजकीय भवितव्यासाठी दीपस्तंभ ठरतील. स्वार्थासाठी कधीही मान न झुकवणाºया चंद्रशेखर यांचे स्मरण करताना एक भारतीय नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो. (भाषांतर : विनोद जैतमल)