आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Today Shettar Government On Agani Parish : Karnatka's Political Crises

शेट्टर सरकारची आजपासून अग्नि परीक्षा : कर्नाटकातील राजकीय संकट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - येदियुरप्पा समर्थक चौदा आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर अल्पमतात आलेल्या कर्नाटकातील शेट्टार सरकारची उद्यापासून अग्निपरीक्षा सुरू होत आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ घातले आहे. त्यामुळे सरकारच्या एकूण भवितव्यावरच अनिश्चिततेची टांगती तलवार आहे.

गेल्या आठवड्यात येड्डीसमर्थक 14 आमदारांनी राजीनामा देऊन मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांना हादरा देण्याचा प्रयत्न केला. त्याअगोदर शेट्टार यांचे सरकार पाडण्याची भीष्मप्रतिज्ञा येड्डीनी घेतली होती. त्यानुसार राज्याने गेल्या आठवड्यात जोरदार राजकीय घडामोडी पाहिल्या. राज्यपाल एच. आर. भारद्वाज हे दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. देशभरात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील होत आहे. त्याच मुद्द्यावर कर्नाटकमधील एका माजी मंत्र्यांनी सरकारचे शरसंधान केले आहे. महिलांवरील हल्ले रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अनेक मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचा शोध घेण्यातही सरकारला अयशस्वी ठरल्याचा आरोप माजी मंत्री शोभा करंडलाजे यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात समर्थकांना राजीनामा द्यायला लावणारे येड्डी यांना कर्नाटक जनता पार्टीने पक्षातून हकालपट्टी केल्याने वेगळेच नाट्यही राज्याने गेल्या आठवड्यात अनुभवले होते. त्यामुळे अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष आहे.
लक्ष राज्यपालांकडे
विधानसभेतील आणखी एक-दोन आमदारांनी राजीनामा दिला तर राज्यपाल एच. आर. भारद्वाज सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देऊ शकतात. सभागृहात कोणत्याही कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी भारद्वाज मुख्यमंत्र्यांना असे आदेश देऊ शकतात. त्यामुळे सर्वांचे लक्ष राज्यपालांकडे लागले आहे.
शेवटचे सत्र
भाजपचे हे शेवटचे विधिमंडळ सत्र आहे. कारण एप्रिल-मेमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेट्टार सरकारला विरोधकांना सांभाळताना नाकीनऊ येणार आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. सहा महिन्यांपूर्वी शेट्टार यांनी भाजपचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून पदाची सूत्रे हाती घेतली होती.

सभागृहातील स्थिती काय?
कर्नाटकची विधानसभा 225 सदस्यीय आहे. तिचा कार्यकाळ मेमध्ये संपणार आहे. त्यातील 224 सदस्य निर्वाचित आणि एक नामनिर्देशित आहे. एप्रिल ते मे या काळात निवडणूक होईल. 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 110 जागी विजय मिळाला होता. पाच अपक्षांच्या मदतीने पक्षाने बहुमत पदरी पाडून घेतले होते, परंतु येदी समर्थकांच्या राजीनाम्यामुळे भाजपकडील आमदारांची संख्या 106 वर आली आहे. त्यामुळे सभागृहातील एकूण संख्याबळही 211 वर आले आहे. काँग्रेसकडे 71 तर जदयूकडे 26 आमदार आहेत.