आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींची दुसरी टर्म, फैसला बुधवारी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 23 जानेवारीला निवडणूक होत आहे. विद्यमान अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या दुस-या टर्मसाठी पक्षांतर्गत विरोध समोर येत असला तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भक्कम पाठिंब्यावर गडकरी यांच्याकडेच पुन्हा नेतृत्व सोपवले जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत. दरम्यान, या निवडणुकीची अधिसूचना रविवारी जारी करण्यात आली.
अडवाणींचा होता आक्षेप : पूर्ती ग्रुपमधील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे गडकरी यांना दुस-या ंदा अध्यक्षपद देण्यास ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीच प्रारंभी आक्षेप घेतला होता. मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चेदरम्यान संघाने गडकरींच्या नावाचा आग्रह धरल्याने अडवाणी यांचाही विरोध मावळला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
गडकरींऐवजी कोण, यावर विविध नेत्यांची मते आजमावण्यात आली तेव्हा एकमत होऊ शकले नाही. अडवाणी यांनी रविशंकर प्रसाद यांचे नाव पुढे केले. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांचेही नाव समोर आले. मात्र, स्वत: स्वराज यांनीच या पदात आपल्याला रस नसल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांच्याही नावाची चर्चा झाली. मात्र, अडवाणी यांच्या यादीत मोदींचे नाव नव्हते.2014 च्या निवडणूक व्यवस्थापनात मोदींची भूमिका महत्त्वूपर्ण ठरू शकते. शिवाय, मोदींनाही हे पद नको आहे.
आमच्यात घराणेशाही नाही
आमच्या पक्षात घराणेशाही नाही. पक्षांतर्गत घटना आणि लोकशाही आहे. याच आधारे राष्ट्रीय पातळीपर्यंत निवडणूक होते, असे भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. नेमक्या कोणत्या नावांवर चर्चा झाली, यावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.