आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी गांधीजींचा धावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तीसगड सरकारने दारूमुक्त आणि नशामुक्त समाजासाठी विशेष जनजागृती अभियान सुरू केले असून या अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर महात्मा गांधींना बनवले आहे. गांधीजींनी जीवनभर समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात नागरिकांना जागृत करण्याचे कार्य केले. हाच धागा पकडून छत्तीसगड सरकारने गांधीजींना या अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर केले आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून गांधीजींच्या चित्रांचे एक कॅलेंडरही सरकारने प्रकाशित केले आहे. दारू आणि सर्व अमली पदार्थ समाज तसेच देशाच्या विकासाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे गांधीजी सांगत. लोकांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन गांधीजी करत. त्यांच्या चित्रांचे कॅलेंडर जनतेला त्यांच्या प्रेरक विचारांची आठवण करून देईल आणि त्यामुळे लोकांना व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात टप्प्याटप्प्याने दारूबंदी लागू केली जात आहे. पहिल्या टप्प्यात दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील दारुची दुकाने बंद करण्यात आली तर दुस-या टप्प्यात अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावांमधील दारूची दुकानांना टाळे ठोकण्यात आले. या प्रकियेत आतापर्यंत राज्यभरातील शेकडो दारुची दुकाने बंद झाली आहेत. याच्या जोडीला भारतमाता वाहिनीही दारु बंदीसाठी कार्यरत आहे. व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी राज्यात 213 भारतमाता वाहिन्या कार्यरत असल्याचे स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष देवजी पटेल यांनी सांगितले.