आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरातील मुलींच्या बँडचा फतव्यामुळे वाजला ‘बाजा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काश्मीरमधील मुलींचा पहिला रॉक बॅँड ‘प्रगाश’ला सोमवारी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. गाणे व वाद्य वाजवणे इस्लामविरोधी असल्याने ते बंद करण्याचा फतवा मुफ्तींनी रविवारी काढला होता. त्यानंतर दुस-या दिवशी तीन मुलींनी बँडमधून माघार घेत असल्याचे सांगितले. दरम्यान, महिला संघटनांनी फतव्यावर टीका केली आहे.

कॉँग्रेस, भाजप, बिजद, महिला आयोग, एआयडीडब्ल्यूए व एनएफआयडब्ल्यू या पक्ष संघटनांनी मुफ्ती बशीरुद्दीन अहमद यांचा फतवा समाजाला मागे नेणारा आहे, अशी टीका केली. प्रत्येकाला स्वत:चे विचार असतात. समाजात परंपरा सांभाळल्या जातात. मात्र स्वातंत्र्यानंतर आपण महिलांना कोणत्या क्षेत्रात संधी नाकारली आहे का? तसे केल्यास आपण दुटप्पी ठरू, असे मत राष्‍ट्री य महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी व्यक्त केले. स्त्री-पुरुष समानता असावी, असे आपण म्हणतो. मात्र, त्याच वेळी स्त्रियांवर बंधने घातली जातात. मुली ठरावीक कामे करू शकत नाहीत, अशी कोणाची धारणा असेल तर ती चूक ठरेल, असे शर्मा म्हणाल्या.

प्रगाश बॅँड: काश्मीर खो-या त डझनभर बॅँड आहेत. मात्र, गेल्या वर्षी फक्त मुलींच्या सहभागातून प्रगाश रॉक बॅँडची स्थापना करण्यात आली होती. अल्पावधीतच हा बँड प्रचंड लोकप्रिय ठरला. खो-या त सध्या प्रगाश रॉक बँडचीच चर्चा आहे. या बँडमध्ये काम करणा-या सर्व मुली दहावीत शिकणा-या आहेत. उमलत्या कळ्यांच्या आविष्कार ठरलेल्या प्रगाशला वार्षिक बॅँड स्पर्धेत उत्कृष्ट बॅँडचा बहुमान प्राप्त झाला आहे. त्यामुळे या बँडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ओमर अब्दुल्लांचा पाठिंबा
विरोधी पक्ष पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी सध्याचा वाद अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. मुफ्ती धर्माची बदनामी होऊ शकेल, अशा प्रत्येक मुद्द्यावर मत व्यक्त करत असतात, असे अख्तर म्हणाले. दरम्यान, एआयडीडब्ल्यूए व एनएफआयडब्ल्यू यांनी संयुक्त पत्रकात फतव्यावर टीका केली. महिलांना घटनादत्त अधिकार प्राप्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंधने लादली जाऊ शकत नाहीत. कोत्या मनाची माणसे धर्माच्या नावावर अशी बंधने घालतात, असे या पत्रकात म्हटले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी फतवा नामंजूर केला आहे. त्यांनी या आशयाचे ट्विट केले होते. मात्र, अल्पावधीत ते काढून टाकण्यात आले.

समाज मागे जाईल
मुलींच्या रॉक बॅँडवर निर्बंध लादल्यास समाज मागे जाईल. मुस्लिम वा हिंदू मूलतत्त्ववाद देशाला 18 व्या शतकात घेऊन जाईल, असे मी नेहमी म्हणतो. अशा फतव्यांना पाठिंबा दिला जाऊ नये.
दिग्विजयसिंह, सरचिटणीस, कॉँग्रेस
हुरियतचे अंतर : फतव्यापासून कट्टरपंथीय हुर्रियत कॉन्फरन्सने अंतर राखले आहे. फतव्याशी आमचा संबंध नाही, असे हुर्रियतचे प्रवक्ते अयाज अकबर यांनी सांगितले.