गोंडा (उत्तरप्रदेश)- उत्तरप्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात एका न्यायाधिशावर 13 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या चेंबरमध्ये कपडे काढायला लावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्यात म्हटले आहे की, न्यायाधिशांनी संबंधित मुलीला आपल्या चेंबरमध्ये हे तपासण्यासाठी बोलावले की ती अल्पवयीन आहे की नाही. त्यावेळी त्यांनी तिला स्पर्श करुन छेडछाड केली. दुसरीकडे 21 वर्षांच्या आणखी एका महिलेने आरोप केला आहे की संबंधित न्यायाधिशाने आपल्यासोबत त्यांच्या चेंबरमध्ये असाच प्रकार केला आहे. दरम्यान, त्याबाबत तिने पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही याचे स्पष्टीकरण तिने दिले नाही. एक वृत्तवाहिनीनुसार, हे न्यायाधिश या दोन्ही महिलांचे अपहरणप्रकरणी सुनावणी करीत होते. पोलिसांचे म्हणणे आहे न्यायाधिशांच्या विरोधात गुन्हा दाखल करायवयाचा असल्यास त्यांना अलाहाबाद हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागेल ज्याची आम्ही वाट पाहत आहोत.