आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goondaraj In Uttar Pradesh; Minister Raja Bhaiyya Resigne

उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज; मंत्री राजाभैय्या पायउतार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - पोलिस उपअधीक्षक झिया-उल-हक हत्या प्रकरणात अडकल्यानंतर उत्तर प्रदेशचा मंत्री रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजाभय्याने सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजाभय्याच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हत्याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे संकेत दिले आहेत.

प्रतापगड जिल्ह्यात एका सरपंचाची हत्या झाल्यानंतर जमावाने केलेल्या हल्ल्यात झिया-उल-हक यांचा शनिवारी मृत्यू झाला. अखिलेश यादव यांनी हक यांच्या देवोरिया या मूळ गावी जाऊन त्यांची पत्नी परवीन आझाद यांचे सांत्वन केले. आझाद यांनी त्यांच्याकडे हत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. यादव यांनी ही मागणी स्वीकारली जाईल, असे आश्वासन दिले.

आरोपी कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याला तुरुंगात पाठवले जाईल. तसेच सीबीआय चौकशीची शिफारस केली जाईल, असे यादव यांनी पत्रकारांना सांगितले. यादव यांच्या दौ-यावेळी स्थानिक लोकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या प्रकरणात चार एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर राजाभय्याच्या दोन समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये गुड्डू सिंगचा समावेश आहे. त्याआधी विरोधकांनी विधानसभेत हत्येचा मुद्दा लावून धरल्यानंतर यादव यांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषीविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
44 वर्षीय राजाभय्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो काही काळ तुरुंगातही होता. राजाभय्यानेच हक यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप परवीन आझाद यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केला आहे. कुंडा विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या राजाभय्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय होते. राजाभय्याने सोमवारी सकाळी अखिलेश यादव यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. राज्यपाल बी.सी. जोशी यांनी राजीनामा स्वीकारल्याचे सूत्रांनी सांगितले.

हत्येऐवजी बदली केली असती : राजाभय्या
राजाभय्याने स्वत:ला निर्दोष ठरवत झिया-उल-हकसोबत शत्रुत्व असल्याचा इन्कार केला आहे. हक आणि आपल्यात कोणताही वाद नव्हता. मी हत्या करण्याऐवजी त्यांची सहज बदली करू शकलो असतो, असे राजाभय्याने सांगितले. राजीनाम्यानंतर विधानसभेत केलेल्या निवेदनात राजाभय्याने समाजवादी पार्टीची बदनामी रोखण्यासाठी आपण तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. हक यांच्यावर हल्ला होत असताना घटनास्थळावरून पळालेल्या 18 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.