आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Government May Refuse Handover Of Afzal Guru Dead Body To His Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफझलचा मृतदेह कुटुंबियांच्‍या स्‍वाधीन होण्‍याची शक्‍यता कमी, काश्मिरमध्‍ये अलर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/श्रीनगर- संसदेवर 2001 मध्‍ये झालेल्‍या हल्‍ल्याप्रकरणी दोषी ठरलेल्‍या अफझल गुरुला फाशी दिल्‍यानंतर केंद्र सरकार आता त्‍याचा मृतदेह कुटुंबियांना देण्‍यास नकार देण्‍याच्‍या तयारीत आहे. तर शुक्रवारच्‍या नमाजच्‍या पार्श्‍वभूमीवर काश्मिरमध्‍ये तणाव असून सेना हाय अलर्टवर आहे.

अफझल गुरुची पत्‍नी तबस्‍सुम हिने गृह मंत्रालयाला पत्र लिहून पतिचा मृतदेह सोपविण्‍याची मागणी केली आहे. प्राप्‍त माहितीनुसार, दिल्‍ली जेल मॅन्‍युअलचा आधार घेत तिची मागणी केंद्र सरकारकडून फेटाळण्‍यात येऊ शकते. तबस्‍सुमच्‍या मागणीच्‍या समर्थनार्थ जम्‍मू-काश्मिर सरकारनेही गृह मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. जेल मॅन्‍यूअलनुसार, मानव शरीर कोणाचीही संपत्ती असू शकत नाही. त्‍यामुळे त्‍यावर कोणीही दावा करु शकत नाही. अंत्‍य संस्‍कारापूर्वी कोणी दावा केला तर एखाद्या कैद्याचा मृतदेह कुटुंबिय किंवा मित्रांना सोपविण्‍यात येऊ शकतो. त्‍यानंतर कोणी मागणी केल्‍यास प्रकरण पोलिस आयुक्तांकडे पाठविण्‍यात येते. ते कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतात. संवेदशनशील प्रकरण असल्‍यास किंवा अं‍त्‍य संस्‍कारादरम्‍यान हिंसाचाराची शक्‍यता असल्‍यास मृतदेह सोपविण्‍यास नकार देण्‍यात येऊ शकतो. याचा आधार घेऊन सरकार अफझलचा मृतदेह कोणालाही सोपविण्‍यास नकार देऊ शकते. अफझलला फाशी दिल्‍यानंतर तिहार तुरुंगातच त्‍याचा मृतदेह दफन करण्‍यात आला होता.

या सर्व घडामोडींच्‍या पार्श्‍वभूमिवर काश्मिरमध्‍ये भारतीय सैन्‍य हाय अलर्टवर आहे. शुक्रवारचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. नमाजनंतर तणाव वाढू शकतो, असे गुप्‍तचर खात्‍याने म्‍हटले आहे. त्‍यामुळे सैन्‍याला इशारा देण्‍यात आला आहे. दुसरीकडे पाकिस्‍तानकडून शांतता भंग करण्‍याचे प्रयत्‍न होत आहेत. राजौरी जिल्‍ह्यात पाकिस्‍तानने पुन्‍हा एकदा शस्‍त्रसंधीचा भंग केला आहे. भारतीय जवानांनी घूसखोरीचा प्रयत्‍न उधळून लावताना एका घूसखोराला ठार मारले. तर पाकिस्‍तानच्‍या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे.